Jagdeep Dhankhar : सोनिया आणि ममताही कुटुंबाच्या संपर्कात होते; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिली माहिती

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांना ९ मार्च रोजी एम्समध्ये दाखल केल्यानंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी धनखड यांच्या कुटुंबाशी संपर्क साधला होता आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. धनखड यांनी सोमवारी राज्यसभेत स्वतः याबाबत माहिती दिली.
पश्चिम बंगालचे राज्यपाल असताना जगदीप धनखड आणि ममता बॅनर्जी यांच्यात अनेकदा तिव्र मतभेद दिसून आले. ममता सरकार आणि गव्हर्नर हाऊसमधील हे मतभेद संघर्षात रूपांतरित झाल्याचे दिसत होते, परंतु धनखड आणि मुख्यमंत्री ममता यांच्यातील वैयक्तिक संबंधांवर त्याचा परिणाम झाला नाही. उपराष्ट्रपतींनी स्वतः सांगितले की, त्यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर ममता बॅनर्जी आणि सोनिया गांधी त्यांच्या कुटुंबाच्या संपर्कात होत्या.
प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर, धनखड यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्यांदाच सभागृहाचे कामकाज पाहिले. विविध पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केलेल्या चिंतेने ते भारावून गेले आणि यामुळे त्यांची प्रकृती लवकर बरी होण्यास हातभार लागला आहे, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, सभागृह नेते जगत प्रकाश नड्डा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे हे माझ्या कुटुंबाशी संपर्क साधणारे पहिले नेते होते. सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या पत्नीशी संपर्क साधला. धनखड यांनी हे सांगितले तेव्हा सोनिया गांधी सभागृहात उपस्थित होत्या. तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी आपल्याला आराम करण्याचा सल्ला दिला याचाही त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
धनखड म्हणाले की सदस्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केलेली चिंता ही त्यांच्यासाठी जाणीव होती की जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा आपली अंतःकरणे एकमेकांशी जोडलेली असतात. हे माझ्यासाठी प्रेरणा आणि ज्ञानाचा स्रोत असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची रूग्णालयात भेटून प्रकृतीची विचारपूस केली. अन्य नेत्यांनाही रुग्णालयात यायचे होते पण निर्बंधांमुळे ते शक्य झाले नाही. मी त्या सर्वांचे आभार मानतो.





