Sonam Wangchuck : वांगचुक यांची बिनशर्त सुटका करावी; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने केली मागणी

नवी दिल्ली : कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सने वांगचुक यांची तातडीने बिनशर्त सुटका करण्याची मागणी केली. त्या संघटनेने लेहमधील हिंसाचारासाठी लडाखच्या प्रशासनाला जबाबदार धरले. अलायन्सच्या नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीत समावेश या मागण्यांशी तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या देशासमोर विविध प्रकारची आव्हाने उभी आहेत. अशात संवेदनशील विभाग असणाऱ्या लडाखमधील जनतेशी अयोग्य वागणूक व्यवहार्य ठरणार नाही. अयोग्य वागणूक मिळाल्यास लडाखमधील जनतेत असुरक्षितता आणि परकेपणाची भावना वाढेल, असा इशारा त्यांनी दिला. भारतीयांच्या डीएनएमध्ये लोकशाही असल्याचे स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. मग, लडाखने लोकशाहीची मागणी करण्यात गैर काय, असा सवालही त्यांनी केला.
लडाखच्या लढ्याविषयीची माहिती याआधी खूप कमी लोकांना होती. मात्र, वांगचुक यांच्या अटकेनंतर लडाखचा विषय देशातील प्रत्येक घरात पोहचला. याआधी केवळ लडाखमध्ये आंदोलन सुरू होते. आगामी काळात देशाच्या विविध भागांत निदर्शने होतील, असे भाकितही अलायन्सच्या नेत्यांनी केले.





