भोपाळ : मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील रहिवासी राजा रघुवंशी यांचा मृत्यू आणि त्यांच्या पत्नीच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआय चौकशीची विनंती केली आहे. याशिवाय त्यांनी मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली आहे. हे जोडपे इंदूरहून मेघालयात हनीमूनसाठी गेले होते. दरम्यान, दोघेही बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात बराच शोध घेतल्यानंतर अखेर बेपत्ता तरुण राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडला होता. मात्र त्यांची पत्नी सोनम रघुवंशी यांचा अद्याप शोध लागलेला नाही. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. या संकटाच्या वेळी मध्य प्रदेश सोनम रघुवंशी यांच्या कुटुंबासोबत उभा आहे. मी या संदर्भात मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मध्य प्रदेशचे वरिष्ठ पोलिस अधिकारी मेघालयाच्या अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहेत. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश देण्याची विनंती केली आहे. सोनम रघुवंशी यांच्या सुरक्षित परतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.