Sonali Bendre : त्या एका गोष्टीमुळे सोनाली बेंद्रेने नियम मोडला! राख वेबसिरीजसाठी घेतला मोठा निर्णय
Sonali Bendre : मोना अरोरा या शिक्षिकेचं पात्र सोनालीने साकारले आहे. जिच्या दोन मुलांचे अपहरण करून त्यांची अत्यंत निर्घूणपणे हत्या केली जाते.

Sonali Bendre : 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रेने कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर मात केल्यानंतर आपल्या आयुष्याबरोबरच करिअरकडे लक्ष केंद्रीत केले आहे. स्टेज 4 मेटास्टॅटिक कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज दिल्यानंतर तिने स्वतःसाठी एक खास नियम ठरवला होता. चित्रपटात फक्त सकारात्मक आणि आशावादी भूमिका स्वीकारायच्या. मात्र, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘राख’ या वेबसिरीजसाठी तिने हा नियम मोडला. हे करण्यामागचे कारण तिने स्वतः उघड केले आहे.
एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना सोनाली म्हणाली, कॅन्सरमधून सावरल्यानंतर तिला अशा भूमिका करायच्या होत्या, ज्या आयुष्यात सकारात्मकता आणि आनंद निर्माण करतील. त्यामुळे तिने हलक्याफुलक्या आणि मनोरंजक कथांनाच प्राधान्य दिलं. ‘लव्ह के लिए कुछ भी करेगा’सारख्या चित्रपटाविषयीच्या आठवणी सांगताना तिने आनंददायी वातावरणाचाही उल्लेख केला.
मात्र, ‘राख’सारखी डार्क वेबसीरिज या विचारांच्या अगदी विरुद्ध होती. दिल्लीतील 1978 मधील गाजलेल्या रंगा-बिल्ला हत्याकांडावर आधारित असलेल्या या क्राइम थ्रिलर वेबसिरीजमध्ये सोनालीने एका दुःखी आईची भूमिका साकारण्याचं धाडस दाखवलं. मोना अरोरा या शिक्षिकेचं पात्र सोनालीने साकारले आहे. जिच्या दोन मुलांचे अपहरण करून त्यांची अत्यंत निर्घूणपणे हत्या केली जाते.
सोनालीने बोलताना कबूल केले की, अशा प्रकारच्या गंभीर आणि भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक भूमिकेसाठी ती मानसिकदृष्ट्या तयार नव्हती. पण दिग्दर्शक प्रोसित रॉय यांनी कथा सांगितल्यानंतर या भूमिकेला ती नकार देऊ शकल्या नाही.
“कथा आणि माझं पात्र इतकं प्रभावी होतं की, ही भूमिका स्वीकारण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. हा माझ्यासाठी एक वेगळा आणि संस्मरणीय अनुभव ठरला,” असे सोनाली म्हणाली. या वेबसिरीजमध्ये अली फजल आणि आमिर बशीर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या वेबसिरीजला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 12 जून रोजी ही वेबसिरीज प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम करण्यात आली आहे.
हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणा देणारा
2018 मध्ये सोनाली बेंद्रेला स्टेज 4 मेटास्टॅटिक कॅन्सरचे निदान झाले होते. या जीवघेण्या आजाराविरुद्ध तिने दीर्घ लढा देत यशस्वीरित्या मात केली. त्यानंतर 2022 मध्ये ‘द ब्रोकन न्यूज’ या वेबसिरीजमधून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले. कर्करोगावर मात करून पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रिय झालेल्या सोनाली बेंद्रेचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.






