Nagar | सोनई-मोरया चिंचोरे रस्त्याचे काम धिम्या गतीने

सोनई, (वार्ताहर) – सोनई मोरया-चिंचोरे रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती. आता कुठेतरी रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम सुरू झाले असले तरी काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून, निवडणुकीपूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा होती.
मात्र, ठेकेदार आपल्या पद्धतीने व आपल्या मर्जीने काम करत असल्याने पाच वर्षापासून रखडलेल्या रस्त्याचे काम होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्याच्या कामासाठी मोरयाचिंचोरे येथून संबंधित ठेकेदाराने मुरुम उचलला होता. त्याच्या मोठ्या डंपरमुळे या रस्त्याची पुरती वाट लागली होती. आता राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्याचे काम झाले तरी सोनई-मोरया चिंचोरे हा रस्ता तसाच आहे. या रस्त्याने दुचाकी चालविणे सुद्धा मुश्किल झाले होते.
त्यावर उपाय म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी खड्डे पडले होते, त्या ठिकाणी किरकोळ डागडुजी करण्यात आली. आता सुरू असलेल्या संबंधित ठेकेदाराने साईडपट्ट्या तीन तीन फूट रुंद केल्या असल्या तरी त्यावर योग्य पद्धतीने भराव टाकला नसल्याने हा रस्ता टिकेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
गेल्या पाच वर्षापासून या रस्त्याचे काम रखडले होते. संबंधित लोकप्रतिनिधीने या रस्त्याकडे कधीच लक्ष दिले नाही. या भागातील जनता जीव मुठीत धरून या रस्त्याने प्रवास करत होते. या रस्त्यावर कायमच किरकोळ अपघात झालेले आहे. त्यात काहींना अपंगत्व आले आहे. तत्कालीन जलसंधारण मंत्री यांच्याहस्ते या रस्त्याचे उद्घाटन होऊन नारळ फोडण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात काम सुरू होण्याला मुहूर्तच मिळाला नाही.
लोहगाव रस्त्यापर्यंत हा रस्ता अत्यंत व्यवस्थितरित्या खोदून करण्यात आलेला आहे. मात्र, पांजरपोळपासून पुढे हा रस्ता गेल्या पाच वर्षापासून झालाच नाही. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडून अनेक अपघात घडले आहे. आता सुद्धा ठेकेदाराने जुना रस्ता खोदून त्यावर डांबरीकरण करणे आवश्यक असताना केवळ साईटपट्ट्या भरून वरून डांबराचा लेप देण्याचा प्रकार ठेकेदाराचा दिसून येत आहे.
त्यामुळे हा रस्ता टिकेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. संबंधित ठेकेदार यांनी याआधी सोनई-घोडेगाव रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरणाचे काम केले खरे मात्र त्या रस्त्यावर काही दिवसानंतरच खड्डे पडलेले दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराच्या कामाचा दर्जा दिसून येतो. हा रस्ता किती दिवस टिकेल, याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एक ते गेल्या पाच वर्षापासून सातत्याने मागणी करून आता कुठेतरी निवडणुकीच्या तोंडावर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, घाई गडबडीत निकृष्ट दर्जाचे काम करून सर्वसामान्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार दिसून येत आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करून हा रस्ता योग्य पद्धतीने व चांगल्या पद्धतीने व्हावा ,अशी नागरिकांच्या अपेक्षा आहे.





