परभणी : परभणीत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला होता. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यानंतर एका आठवड्यात मृत्यूला कारणीभूत असलेल्या संबंधित पोलिसांवर मुबई उच्च न्यायालयाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. परंतु 30 जुलै रोजी म्हणजेच दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला धक्का देत उच्च न्यायालयाचा निकाल कायम करत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या मृत्यू प्रकरणी आता पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये परभणीच्या नवा मोंढा पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर आणि सोमनाथचे कुटुंब काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने सोमनाथ यांच्या खुणाच्या प्रकरणात कोण पोलीस दोषी आहेत ते पाहावे, व त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित नावे या गुन्ह्यात समाविष्ट करावीत असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.