Someshwar News: २५० हेक्टर शेती धोक्यात! सोमेश्वरमधील सोमय्याच्या तळे कोरडेच; पाहा धक्कादायक स्थिती
Someshwar News: श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरापासून अवघ्या २०० मीटरवर असणारे ऐतिहासिक सोमय्याचे तळे कोरडेठाक; पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल.

Someshwar News – श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिराच्या पावन भूमीत,मंदिरापासून अवघ्या सुमारे २०० मीटर अंतरावर असलेले सोमय्याचे तळे हे धार्मिक, तसेच शेतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. चौधरवाडी हद्दीतून पडणारे पावसाचे पाणी या धरणात येते. मात्र, यंदा पावसाने पाठ फिरवल्याने ऑगस्ट महिना सुरू होऊनही धरणात अद्याप किंचितही पाणी साठलेले नाही. हे धरण ग्रामपंचायत करंजेच्या हद्दीत येते.
काही काळापूर्वी धरणाच्या सुशोभीकरण व स्वच्छतेचे काम करण्यात आले होते. परिसरातील सुमारे २०० ते २५० हेक्टर शेती क्षेत्रासाठी या धरणाचा मोठा आधार आहे. धरणात पाणीसाठा झाल्यास लगतच्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो. मात्र, यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने धरण कोरडेच राहिले आहे.
यात्रेकरूंसाठीही महत्त्वाचे ठिकाण
श्री क्षेत्र सोमेश्वर येथे श्रावण महिन्यात तसेच विविध धार्मिक उत्सवांच्या काळात मोठ्या संख्येने भाविक येतात. सोमेश्वर मंदिराच्या दर्शनाबरोबरच अनेक भाविक या धरण परिसरात येऊन स्नान करतात. यात्रा व उत्सवाच्या काळात या धरणातील पाणी भाविकांसाठीही मोठी सोय ठरते. त्यामुळे या धरणाला केवळ शेतीपुरतेच नव्हे, तर धार्मिक व सामाजिकदृष्ट्याही विशेष महत्त्व आहे.
पावसाची प्रतीक्षा कायम
पावसाळा सुरू होऊनही अपेक्षित पाऊस न झाल्याने सोमेश्वर धरणात पाण्याचा थेंबही साठलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. आगामी काळात चांगला पाऊस पडून धरण भरावे आणि परिसरातील शेतकऱ्यांना तसेच भाविकांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सोमेश्वराच्या पावन भूमीला आणि परिसरातील शेतकऱ्यांना आधार देणारे हे धरण भविष्यात अधिक सक्षम करण्यासाठी त्याची देखभाल, गाळ काढणे, पाणलोट क्षेत्राचे संवर्धन आणि आवश्यक ठिकाणी जलसंधारणाची कामे करणे गरजेचे आहे. यामुळे पावसाचे पाणी अधिक प्रमाणात अडवून शेतीसाठी कायमस्वरूपी जलस्रोत निर्माण करण्यास मदत होऊ शकते.





