मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरील आरोपसत्र सुरूच ठेवले आहे. सीबीआय, ईडीच्या रडारवरील कंपन्यांकडून सोमय्या देणग्यांच्या रूपाने कोट्यवधींची खंडणी उकळत असल्याचा नवा आरोप राऊत यांनी केला आहे.
पश्चिम बंगालमधील मेट्रो डेअरीच्या मागे आर्थिक अनियमिततांच्या आरोपावरून केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. त्या कंपनीच्या ठिकाणांवर सीबीआय आणि ईडीने छापेही टाकले. संबंधित कंपनीकडून सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला 2019 मध्ये काही लाख रुपयांची देणगी मिळाली.
त्या प्रतिष्ठानला 172 कंपन्यांनी संशयास्पद देणग्या दिल्या आहेत. भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचा दिखावा करून सोमय्या मागील काही वर्षांपासून खंडणी वसुली करत आहेत. त्यासंदर्भात धर्मादाय आयुक्तांना तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई पोलीसही तपास करत आहेत. केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून सोमय्यांची वसुली सुरू आहे. त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे, असे राऊत येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.