महायुतीत जुपली; मी तुमचे प्रकरण काढतो, तुम्ही माझे काढा; सुरेश धसांना राष्ट्रवादीच्या नेत्याचा थेट इशारा

बीड : बीड जिल्हा गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेचा विषय बनला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घातल्याचं दिसत आहे. अशातच आता आमदार सुरेश धस यांच्यामुळे आपल्याला त्रास होत आहे, असा गंभीर आरोप माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केले आहेत.
आजबे म्हणाले, महायुतीमध्ये असताना बीडच्या आष्टी मतदारसंघात भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आमची कामं अडवली, कार्यकर्त्यांची बिले अडवली. या संदर्भात तक्रार करूनही महायुतीत दखल घेतली जात नसेल तर स्वतंत्र निर्णय घेऊ भलेही एमआयएममध्ये जाऊ. असा इशाराच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांनी दिला आहे. त्यामुळे आष्टी मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये जुंपल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मी अन्याय सहन करणारा माणूस नाही : बाळासाहेब आजबे
पुढे बोलताना म्हणाले, मी अन्याय सहन करणारा माणूस नाही. माझ्या पार्टीने माझी दखल घेतली नाही. तर एमआयएममध्ये जायची पाळी आली तरी माझी तयारी आहे. तसेच माझ्या कुटुंबाला अटक करण्यासाठी खोटे पत्र दिले आहे. तिथे उजडेल तिथे उजडेल. आता मी तुमचे प्रकरण काढतो आणि तुम्ही माझे प्रकरण काढा. सुरेश धस यांना कुठेही सुट्टी देणार नाही, असे देखील बाळासाहेब आजबे यांनी सांगितले आहे.
मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळविले आहे. अजितदादांनाही सांगितले आहे. आम्हाला जर महायुतीमध्ये असताना जर कामं चालू करणे आणि बिल करण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर निर्णय घेऊ. तसेच सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यांच्या नावावर मतदारसंघातील विविध ठिकाणच्या देवस्थानच्या जमिनी करण्यात आल्या आहेत, असा आरोप देखील आजबे यांनी केला आहे.





