हडपसर वाहतूक कोंडीमुक्त करा; आमदार चेतन तुपे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

हडपसर – पुणे – सोलापूर महामार्ग हा मुख्य रस्ता असल्याने येथे वर्दळ जास्त आहे. यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो आहे. मगरपट्टा ते सोलापूर हायवे या रस्त्यावरची अतिक्रमणे हटविणे, रस्त्याची रुंदी वाढविणे, मोठे पदपथ वाहतुकीसाठी वापरणे तसेच येथील अनाधिकृत खासगी बसेसचा थांबा मांजरी बुद्रुक- शेवाळेवाडी येथील पीएमपीएल डेपोच्या जागेत भाडे तत्वावर करावा आणि हडपसर हे वाहतूक कोंडी मुक्त करावे, अशा सूचना आमदार चेतन तुपे पाटील यांनी महापालिका व वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आमदार चेतन तुपे यांनी महापालिका व पोलीस अधिकारी यांच्या समवेत पुणे सोलापूर महामार्गाची पाहणी केली. त्यावेळी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपयुक्त संदीप कदम, उपायुक्त प्रसाद काटकर, सहाय्यक आयुक्त बाळासाहेब ढवळे, अधीक्षक अभियंता रावसाहेब दांडगे, कार्यकारी अभियंता चव्हाण, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, माजी नगरसेवक योगेश बापू ससाणे यांच्यासह पुणे मनपा अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
भैरोबा नाला ते सोलापूर रस्ता, सासवड रस्ता, फुरसुंगी येथे रस्त्यावर असलेल्या बीआरटी, पदपथ, सायकल ट्रॅक याचा आढावा घेऊन रस्त्याची अजून एक लाईन वाढविण्यात येईल. तसेच वाहतुकीस अडथळा ठरणारे पूल, झाडे, विद्युतखांब, डीपी बाजूला करून रस्ता रुंद करणे, मार्गदर्शक फलक लावणे, दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पर्यायी पार्किंग व्यवस्था करण्यात यावी, असेही आमदार तुपे यांनी अधिकाऱ्यांना सुचविले.
खासगी बसेसला पीएमपीएल डेपोत भाडेतत्त्वावर जागा द्यावी !
हडपसर मध्ये पुणे-सोलापूर रस्त्यावर खाजगी वाहतूक करणाऱ्या बसेस उभ्या राहतात. सातत्याने तक्रार करून या बसेस हटवून देखील काही दिवसांनी परत येथे बसेस उभ्या राहतात. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून शेवाळेवाडी- मांजरी बुद्रुक येथील पीएमपीएल डेपोच्या जागेत भाडे तत्वावर जागा खाजगी बस मालकांना उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना आमदारांनी मांडली असून याचा फायदा अतिरिक्त उत्पन्न मिळून पीएमपीएलला देखील होईल. यावर सकारात्मक विचार करण्यात येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
“नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत आहे, आज हडपसर परिसराला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांनी आज आमच्या मागण्यांची दखल घेत वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ आणि तातडीने कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे. लवकरच या रस्त्यांची कामे पूर्ण करून नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येतून मुक्तता मिळेल यासाठी मी जातीने लक्ष घालून या कामांचा पाठपुरावा करत राहील.” – चेतन तुपे पाटील (आमदार, हडपसर विधानसभा)





