पुणे बोपोडी परिसरातील वाहतूक कोंडी सोडवा

औंध, दि. 17 (प्रतिनिधी) -मुंबई-पुणे महामार्गावर बोपोडी ते संविधान चौक येथे मेट्रोसाठी करण्यात येणाऱ्या ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण झालेले आहे. तरीही या मार्गावरील शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक खडकीमार्गे वळविण्यात आली आहे. या मार्गावरील रस्ता अरुंद आहे तसेच या रस्त्यात प्रचंड खड्डे पडले आहेत. यामुळे बोपोडी, खडकी, औंधरोड पासून पिंपरीपर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी होत आहे. या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून नागरिक औंधरोड खडकी स्टेशन, रेंज हिल्स या मर्गाने जात आहेत.
यावर मार्ग काढावा, अशी मागणी वारंवार करूनही प्रशासन याबाबत गांभीर्याने लक्ष देत नसल्याने भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. खडकी स्टेशन परिसरातील साई मंदिर येथे आंदोलन करण्यात आले. भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने तसेच माजी नगरसेवक प्रकाश ढोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे तसेच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गाडगीळ यांना देण्यात आले. यावेळी भाजप शिवाजीनगर मंडल सरचिटणीस आनंद छाजेड, पुणे शहर भाजप माजी उपाध्यक्ष मुकेश गवळी, ज्येष्ठ नेते गोपाळ नेटके, खडकी भाजप अध्यक्ष धर्मेश शहा, शिवाजीनगर भाजप युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे, अजित पवार, राहुल कांबळे, अनिल माने, रोहित झणझणे,सचिन घोरपडे, अविराज हुगे, धनंजय दरे, संतोष भिसे, योगेश केरकर, शशिकांत भालेराव, धीरज पंगुडवाले आदी उपस्थित होते.





