पुणे | वाहतूक कोंडीची डोकेदुखी सोडवा

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – साधू वासवानी पुलाच्या प्रस्तावित पाडकामासाठी पुलावरील वाहतूक बंद करून वाहतूक विभागाने कोरेगाव पार्क- बंडगार्डन भागात वाहतुकीमध्ये मोठे बदल केले. मात्र, त्यामुळे मागील तीन दिवसांपासून येथील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.
ही कोंडी सोडविण्यासाठी मार्गात बदल करावे, त्यासाठी वेक-अप पुणेकर’ आणि धैर्यशील वंडेकर यांच्या वतीने आयोजित बैठकीत रहिवाशांनी वाहतूक कोंडीवर पर्याय सुचवला. त्याबाबत वाहतूक पोलिसांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती वेकअप पुणेकरचे माजी आमदार मोहन जोशी आणि धैर्यशील वंडेकर यांनी दिली.
या बैठकीत त्यांनी कोरेगाव पार्क, बोट क्लब, बंड गार्डन या विभागांतील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या बैठकीस धैर्यशील वंडेकर, डॉ. विद्या दामले, समीर रूपानी, भारती पाटील, साथी नैयर, डॉ. बोरगावकर, मनोज फुलपगार, शुभांगी, अमृता चंदानी, मल्लिका साबुनानी, अनाहिता आणि व इतर नागरिक उपस्थित होते.
वाहतूक पोलिसांतर्फे मार्गात केलेले बदल यशस्वी झाले नसून, पर्यायाने वाहतूक कोंडी वाढली. त्यामुळे आता प्रायोगिक तत्त्वावर साधू वासवानी पुलावरील वाहतूक बंद केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा बदल न करता वाहतूक आहे तशी चालू ठेवावी. यामुळे गर्दीच्या वेळी वाहतूक जरी धीम्या गतीने झाली, तरी कोंडी होण्याची शक्यता फार कमी आहे, तसेच मंगलदास रोड, बंडगार्डन रोड जे एकेरी करण्यात आले आहेत, ते पूर्ववत करण्यात यावेत.
प्रायोगिक तत्त्वावर वाडिया कॉलेज चौक ते जहांगीर चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करून त्या बाजूस जाणारी वाहतूक ही वाडिया कॉलेजवरून डावीकडून पुढे रेसिडेन्सी क्लब चौकातून उजवीकडे वळवून पुन्हा अलंकार चौकातून उजवीकडे वळून जहांगीर चौकात घेता येईल, असे नागरिकांनी एकमताने सांगितले.
शाळा सुरू झाल्यानंतर या भागात स्कूल बस आणि रिक्षामुळे कोंडी वाढेल. त्यामुळे शाळांशी चर्चा करून या बस, रिक्षा रस्त्यावर पार्क न करता त्यांच्या आवारात पार्क करण्याचे आणि शाळा सोडण्याच्या वेळेत थोडाफार बदल करण्यास सुचवावे, असाही निर्णय बैठकीत झाला.




