सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये अवघ्या 24 तासात संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. यामध्ये कुटुंबातील तिघांचा विहिरीत तर एकाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. हि संपूर्ण घटना घरगुती वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? म्हमाजी आसबे, पत्नी मोनाली आसबे, मुलगी ऐश्वर्या आणि मुलगा कार्तिक असं मृत पावलेल्या चौघांची नावं आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार रविवारी पती म्हमाजी आणि पत्नी मोनाली यांच्यात घरगुती कारणातून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर मोनाली यांनी रागाच्या भरात मुलगी ऐश्वर्या आणि मुलगा कार्तिक यांना सोबत घेऊन घराजवळील विहिरीत उडी मारली. या घटनेत तिघांचाही नाकातोंडात पाणी जाऊन मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच धक्का सहन न झाल्याने पती म्हमाजी आसबे यांनीही आज सोमवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. घरगुती कारणातून झालेल्या वादामुळे अवघ्या चोवीस तासात संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला. एकाच कुटुंबातील चौघांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.