Solapur News : बार्शी पोलीसांची धडक कारवाई ! 600 किलो गांजा केला जप्त

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका पोलिसांनी धडक कारवाई करताना कोट्यवधी रुपये किंमतीचा तब्बल ६०० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. बार्शीच्या ग्रामीण भागातून जाणाऱ्या टेम्पोमधून गांजाची तस्करी होणार आहे, अशी टीप खबऱ्याने पोलिसांना दिली होती. बार्शी पोलिसांनी खबऱ्याच्या एका टीपवर सापळा लावला.
संशयास्पद टेम्पोची आणि लॉरीची तपासणी करत असताना पोलीसांना मुद्देमाल अढळला. अमली पदार्थाविरोधातील राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय दिलीप ढेरे यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात अजूनही सखोल तपास सुरू आहे. संबंधित आरोपींबाबत आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
गांजा तस्करीच्या नेटवर्कचा संपूर्ण उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपी हा गांजा कुठे विक्री करणार होते, याचा तपास सुरू असून पोलिसांनी कोट्यवधी रुपये किंमतीचा गांजा आणि तीन वाहने जप्त केली आहेत.





