Solapur Lok Sabha: जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी शिंदेंकडून सोलापूरच्या उमेदवाराची घोषणा

Solapur Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 22, काँग्रेस 16 आणि राष्ट्रवादी (शरद पवार)10 जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सोलापूरची जागा ही काॅंग्रेसच्या वाट्याला आहे. अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. अशातच आज काॅंग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर मतदारसंघाचा उमेदवारही जाहीर केला आहे.
येत्या काळात जर देशात लोकशाही टिकवायची आहे की, हुकूमशाही याचा विचार करण्याची वेळ आली आहे. प्रणिती ( Praniti Shinde) सारख्या विद्वान लोकप्रतिनिधीला संसदेत पाठवून पुन्हा एकदा सोलापूरचे नाव दिल्लीत गाजवू द्या, असे आवाहन करत सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी सोलापूर मतदारसंघासाठी प्रणिती शिंदे यांचे नाव जाहीर केले.
सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत ते बोलत होते. रस्ते, एनटीपीस, पॉवर ग्रीडचे काम आम्ही केले. मात्र पंतप्रधान मोदींनी त्याचे उदघाट्न केले. आम्ही सुरु केलेल्या कामाकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिले नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
अटल बिहारी वाजपेयी यांचे कौतुक –
यावेळी सुशीलकुमार यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे कौतुक केले. शिंदे म्हणाले, अटल बिहारी हे सज्जन पंतप्रधान होते, त्यांना देखील बाजूला सरण्याचे काम केले गेले. राम मंदिरमध्ये अडवाणी आणि यांनी राम मंदिर बनवण्यासाठी रथयात्रा काढली होती. भाजपा सत्तेत आली आणि जिथे तिथे आश्वासन देत सुटली. जी काम आम्ही केली त्याच कामाचे उद्घाटन हे करत सुटले, असेही सुशीलकुमार शिंदे यांनी नमूद केले.





