Solapur District Bank: सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा! १९ पैकी १८ जागांवर सहकार विकास पॅनलचा विजय
Solapur District Bank: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला असून, भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने बँकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे.

Solapur District Bank: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला असून, भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने बँकेवर एकहाती सत्ता मिळवली आहे.
संचालक मंडळाच्या एकूण १९ जागांपैकी तब्बल १८ जागांवर या पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याशी संबंधित स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे सोलापूर जिल्हा बँकेवरील भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणित सहकार विकास पॅनल आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील प्रणित स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनल यांच्यात थेट लढत झाली. या निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे मतमोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
१९ पैकी १० जागा बिनविरोध Solapur District Bank:
संचालक मंडळाच्या १९ जागांपैकी भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने १० जागा आधीच बिनविरोध जिंकल्या होत्या. त्यामुळे उर्वरित ९ जागांसाठी २६ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. या मतदान प्रक्रियेत ८६.९४ टक्के मतदानाची नोंद झाली. एकूण २ हजार ५९६ मतदारांपैकी २ हजार २५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालात भाजपप्रणित पॅनलने ९ पैकी ८ जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
मोहिते पाटील पॅनलला एका जागेवर यश
मतमोजणीतील पहिला निकाल माळशिरस विविध कार्यकारी सोसायटी गटाचा लागला. या गटातून स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचे अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपप्रणित सहकार विकास पॅनलचे उमेदवार शहाजीराजे देशमुख यांचा पराभव केला. त्यामुळे मोहिते पाटील गटाला या निवडणुकीत एकमेव जागा मिळाली.
दुसरीकडे, सांगोला विविध कार्यकारी सोसायटी गटातून आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विजय मिळवला. त्यांनी मोहिते पाटील पॅनलचे उमेदवार संजय इंगोले यांचा पराभव केला. विशेष म्हणजे, बाबासाहेब देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार असून त्यांनी भाजपप्रणित सहकार विकास पॅनलकडून निवडणूक लढवली होती.
भाजपचे विजयी उमेदवार Solapur District Bank:
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार : राजेंद्र राऊत (बार्शी), प्रशांत परिचारक (पंढरपूर), विक्रांत तथा बाळराजे पाटील (मोहोळ), सिद्धेश्वर आवताडे (मंगळवेढा), यशराज शिंदे (माढा), श्रीदीप हसापुरे (दक्षिण सोलापूर), पृथ्वीराज माने (उत्तर सोलापूर), शंभूराजे जगताप (करमाळा), सचिन कल्याणशेट्टी (अक्कलकोट) आणि अजिंक्यराणा पाटील (ओबीसी गट).
मतदानातून विजयी झालेले उमेदवार : बाबासाहेब देशमुख (सांगोला), अर्चना घाडगे (महिला), शामल बागल (महिला), राजेंद्र बंदीछोडे (इतर मागास/भटक्या जमाती गट), रणजितसिंह शिंदे (कृषी व प्रक्रिया), मनीष देशमुख (बँक व पतसंस्था), सूर्यादित्य साळुंखे (दुग्ध विकास) आणि महादेव कांबळे (अनुसूचित जाती).
तर माळशिरस विविध कार्यकारी सोसायटी गटातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवत मोहिते पाटील पॅनलचे खाते उघडले.
शेवटच्या जागेसाठी रंगली चुरस
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात एका जागेसाठी भाजप आणि मोहिते पाटील गटात चुरस पाहायला मिळाली. मात्र या लढतीत भाजपप्रणित पॅनलचे मनीष देशमुख यांनी विजय मिळवला. त्यामुळे भाजपप्रणित सहकार विकास पॅनलने १९ पैकी १८ जागा जिंकत जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान कर्जवाटप आणि सहकारी संस्थांच्या आर्थिक स्थितीवरून दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ बँकेच्या सत्तेची लढाई म्हणून नव्हे, तर जिल्ह्यातील राजकीय प्रतिष्ठेची लढाई म्हणूनही पाहिले जात होते. अखेरच्या निकालाने भाजपप्रणित पॅनलने मोठे यश मिळवले, तर मोहिते पाटील गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले.






