Solapur Accident : सोलापूर अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदतीची घोषणा
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी (Solapur Accident) समोर आली आहे.

Solapur Accident : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी (Solapur Accident) समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत एक पिकअप गाडी कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 भाविकांचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
म्हसवडहून दर्शनावरून परतताना काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व भाविक पंढरपूर तालुक्यातील (Solapur Accident) रांजणी गावातील रहिवासी होते. ते सर्वजण सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथील प्रसिद्ध सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन आपल्या गावाकडे आनंदाने परतत असताना, माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावाजवळ त्यांच्या पिकअप गाडीवरील नियंत्रण सुटले. ही गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खाजगी शेतातील विहिरीत जाऊन कोसळली.
काठोकाठ भरलेल्या विहिरीमुळे मोठी जिवितहानी
ज्या विहिरीत हा पिकअप कोसळला, ती विहीर पाण्याने पूर्णपणे काठोकाठ भरलेली होती. गाडी विहिरीत पडताच लोकांच्या नाकातोंडात पाणी गेले आणि गुदमरल्यामुळे ८ जणांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या सतर्कतेमुळे 7 जणांना सुदैवाने विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या ७ जणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खाजगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
सुदैवाने…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 14, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मदतीची घोषणा
या भीषण अपघाताची माहिती मिळताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून (ट्विट करत) तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. “सोलापूर जिल्ह्यातील (Solapur Accident) माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे एक वाहन खाजगी शेतातील विहिरीत पडल्याने झालेल्या अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सुदैवाने ७ जणांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक दोघेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत आणि स्थानिक प्रशासनाशी आम्ही सातत्याने संपर्कात आहोत. या घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येईल.”
प्रशासन घटनास्थळी दाखल
अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूरचे (Solapur Accident) जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने विहिरीतून गाडी बाहेर काढणे आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. एकाच गावातील ८ जणांचा या अपघातात मृत्यू झाल्यामुळे रांजणी गावावर शोककळा पसरली आहे.






