सोलापूर : ओढ्यातील 6 फूट नर जातीची मगर अखेर रेस्क्यू टीमकडून जेरबंद

सोलापूर :- सोलापुरातील देगाव परिसरातील घाण पाण्याच्या ओढ्यामध्ये दिसलेल्या नर जातीच्या मगरीला जेरबंद करण्यात अखेर मंगळवारी पुण्याच्या रेस्क्यू टीमला यश आले आहे. मगर पकडण्यात आल्यामुळे आजूबाजूच्या शेतकरी आणि पशुपालकांनी सुटकेचा निश्वास सोडला असला तरी आता सापडलेली मगर मोठी असून आणखी एक लहान मगरीचे पिल्लू याच परिसरात असून त्याचासुद्धा शोध घेण्याची मागणी या प्रभागाचे नगरसेवक गणेश वानकर यांनी केली आहे. तर या ठिकाणी पकडण्यात आलेली हि एकमेव मगर असून दुसरी कोणतीही मगर या ओढ्याच्या परिसरामध्ये नसल्याचा दावा सोलापूर वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्र अधिकारी आय. ए. एच. शेख यांनी केला आहे. 

सोलापुरातील देगाव परिसरातील घाण पाण्याच्या ओढ्यामध्ये साधारणपणे महिनाभरापूर्वी मोठ्या मगरीचे दर्शन झाल्यामुळे पशुपालक आणि नागरिकांची झोप उडाली होती . मगर नसावी असेच वनविभागाला वाटत होते.मात्र नागरिकांनी मगरीचे फोटो आणि व्हिडिओ काढून व्हायरल केल्यानंतर वनविभागाने गांभीर्याने घेतले. त्यानंतर सोलापुरातील एका संस्थेला मगर पकडण्याचे काम देण्यात आले. मात्र ते लोक मगर पकडण्यास अनुभवी नसल्याची ओरड झाल्यानंतर वनविभागाने पुण्याच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले होते. १० जणांचे पथक २४ ऑगस्टला देगाव येथे आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी परिसराची माहिती घेतली.पाण्यात शोध घेण्यासाठी म्हणून फायबर बोट मागविली तसेच ओढ्याच्या काठावर सोललेली कोंबडी बांधून पिंजरा लावला होता. अहोरात्र हि टीम ओढ्याच्या काठावर ठाण मांडून होती. अखेर मंगळवारी पहाटे मगर पिंजऱ्यात अलगद सापडली. याबाबतची माहिती पुणे वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर अधिकारी सोलापुरात आले. संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी सायंकाळ झाली. नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून सायंकाळी मगरीला पिंजऱ्यात घालून निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यासाठी नेण्यात आले.

दूषित पाण्यामध्ये अडकलेली मगर कोणतीही इजा न होता मंगळवारी ताब्यात घेतली. नर जातीची मगर असून त्याची लांबी १.८५ मीटर लांबीची आहे. साधारण त्याचे वय ५ वर्षे असून अधिकाऱ्यांच्या सल्यानंतर मगरींचा अधिवास असलेल्या निसर्गात मुक्त करण्यात येणार असल्याचे सांगत या ठिकाणी दुसरी कोणतीही मगर नसून ती केवळ अफवा असल्याचे सोलापूर वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्र अधिकारी आय. ए. एच. शेख यांनी सांगितले.

सोलापूरचा हा सांडपाण्याचा नाला आहे. मगर पकडणे फार जिकिरीचे होते.परिसर दुर्गंधीयुक्त होता. रेस्क्यू टीमचे काम अभिनंदनास पात्र असल्याचे सोलापूरचे वनक्षेत्रपाल चेतन नलावडे यांनी सांगितले.सोलापुरातील मगरीचे फोटो पाहिल्यानंतर सोलापुरात २४ ऑगस्टला टीम पुण्यातून सोलापुरात आली . साधारण ८०० मीटर लांबीच्या नाल्यात एका बाजूला मगरीला अडकवायचे होते. पाण्यात उतरून नाल्याला जाळी मारून ३ पिंजरे टाकले. बोटींमधून शोध घेतला आणि मगर ट्रॅपमध्ये अडकल्याचे पुण्याच्या रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे भूपेश पाटील यांनी सांगितले.

वनविभागाचा कॉल आल्यानंतर सोलापुरात आल्यानंतर ओढ्याची पाहणी केली असता जिकिरीचेच होते. ओढ्याच्या पाण्यात खूप कचरा होता आणि तो जाळीमध्ये सातत्याने अडकत होता परिणामी मगरीला फॉलो करणे खूपच अवघड होते. मात्र टीममध्ये मगर पकडणारे अनुभवी सदस्य असल्याने शक्य झाल्याचे टीमचे सदस्य तोविन्द सातारकर म्हणाले.

दरम्यान सहा महिन्यांपूर्वी कोयना नगर येथील याच घाण पाण्याच्या ओढ्यामध्ये एका शेतमजुराचा मगर दिसली होती. मगर पकडण्यासाठी त्यावेळी वनविभागाने त्याठिकाणी ट्रॅक कॅमेरा व पिंजरा लावला होता . शिवाय वासामुळे मगर काठावर येईल म्हणून वनविभागाने सोललेली कोंबडीसुद्धा बांधली होती. आठवडाभरानंतरसुद्धा त्याठिकाणी कॅमेऱ्यात काहीच न दिसल्याने अखेर वनविभागाने मगरीचा शोध थांबवला होता. त्यानंतर पुन्हा कोयना नगरपासून साधारणपणे एक ते दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या देगाव परिसरातील याच ओढ्यामध्ये नागरिकांना मगर दिसल्यानंतर तिचे फोटो काढून या प्रभागाचे नगरसेवक गणेश वानकर यांना सांगितल्यानंतर पुन्हा दिसलेल्या या मगरीच्या शोधासाठी प्रयत्न सुरु झाले होते .

हनुमंत डोके या नागरिकाच्या सांगण्यानुसार याठिकाणी एकूण दोन मगरी आहेत. त्यातील एक मगर नुकतीच दिसली असून आणखी एक दुसरी मगर याच ठिकाणी वावरत आहे. एकाच ठिकाणी दिसलेली एक आणि न दिसलेली एक आशा दोन मगरींमुळे या भागातील पशुपालक आणि नागरिकांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती . सुरुवातीला पाण्यात सर्प असेल या अनुषंगाने त्या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकाने त्याला दगड मारला असता तो सर्प नसून मगर असल्याचे दिसताच त्याने तेथून धूम ठोकली होती .

डोळ्याने पाहिलेली घटना त्याने गावात येऊन अन्य लोकांना व लोकप्रतिनिधींना सांगितली. बघता बघता गावात मगरींची बातमी वाऱ्यासारखी पसरली . खरे कि खोटे यावरून उलटसुलट चर्चा सुरु झाली. मात्र लक्ष ठेऊन काहीजणांनी मगरीचे फोटो मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले. आणि मग नागरिकांना भलीमोठी मगर पाहून घाम फुटला. दरम्यान वनविभागाने अखेर महिनाभराच्या प्रयत्नानंतर मगरीला जेरबंद करण्यात अखेर यश मिळविल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.