satara | रेल्वे उड्डाण पुलाला जोडलेला मातीचा भराव धोकादायक

वाठार स्टेशन, (प्रतिनिधी) – लोणंद महामार्गावरील वाठार स्टेशन हद्दीतील काळीमोरी येथील नवीन रेल्वे उड्डाण पुलाला जोडलेला मातीचा भराव अवजड वाहतुकीमुळे वारंवार खचत असल्यामुळे धोकादायक बनला आहे याकडे रेल्वे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे दिसते.
पूर्वी लोणंद-सातारा महामार्गावर काळीमोरी जुना उड्डाणपूल अस्तित्वात होता. मात्र हा पूल अरुंद असल्याने रेल्वेच्या दुहेरी मार्गासाठी अडथळा ठरत होता.त्यासाठी रेल्वे प्रशासनाने जुन्या पुलाला लागूनच पश्चिम बाजूस समांतर नवीन उड्डाण पुल तयार केला.
यावेळी दुहेरी मार्गात अडथळा ठरत असलेला जुना पुल जमीन दोस्त करण्यासाठी,आणि पश्चिम बाजूस समांतर असलेल्या जुन्या पुलापेक्षा उंचीवर बांधलेल्या मुख्य पुलाला जोडण्यासाठी व भराव टाकण्यासाठी रेल्वे प्रशासनाने सातारा-लोणंद महामार्गावरील वाहतूक बंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून दि. ६ ऑक्टोबर २०२३ ते १३ ऑक्टोबर २०२३ अशी सात दिवसाची मुदत घेतली होती. या सात दिवसांसाठी महामार्गावरील सर्व वाहतूक अन्य मार्गावरून वळवली होती.
कमी कालावधीमध्ये रेल्वे प्रशासनाने यंत्रणाचा वापर करत जुना पूल जमीनदोस्त करून उंचीवर बांधलेल्या नवीन पुलाला मार्ग जोडण्यासाठी माती व मुरमाचा (भराव) वापर करून रस्ता तयार करून घेतला आणि वाहतुक सुरळीत केली. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असते हा भराव करताना भरावच्या दोन्ही बाजूस संरक्षक भिंत केली नसल्याने जड वाहतुकीमुळे हा भराव सतत खचत आहे.
या खचलेल्या ठिकाणी, वाहने आदळून अपघात होण्याची शक्यता आहे. यासाठी रेल्वे विभागाने या पुलाच्या भरावाच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधून पुन्हा भराव करावा अशी मागणी प्रवासी व वाहनधारकाकडून होत आहे.
सदर खचत असलेला भरावाबाबत आमच्या वरिष्ठ अधिकारी सिनियर सेक्शन इंजिनियर (वर्क) यांच्याकडे पत्र व्यवहाराद्वारे पाठपुरावा करू. स्वामीनाथ- सिनियर सेक्शन इंजिनियर (रेलपथ) वाठार स्टेशन





