Sofiya Qureshi : सोफिया कुरेशींबद्दल ‘या’ नेत्याचं वादग्रस्त विधान; नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर…

भोपाळ : पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विजय शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अब्बास हाफीज यांनी केली आहे. दरम्यान, विजय शाह यांनी त्यांच्या विधानाचे स्पष्टीकरण दिले असून की माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असा दावा त्यांनी केला आहे.
विजय शाह म्हणाले, आपल्या पंतप्रधानांनी आमच्या बहिणींचे सिंदूर नष्ट करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे, माझे भाषण वेगळ्या संदर्भात पाहू नका. जर तुम्ही ते वेगळ्या संदर्भात पाहत असाल तर मी असे म्हणू इच्छितो की माझे शब्द त्या संदर्भात नाहीत. आमच्या बहिणींनी सैन्यासह मोठ्या ताकदीने बदला घेतला आहे.
काँग्रेस प्रवक्ते अब्बास हाफीज यांनी विजय शाह यांना मंत्रिपदावरून बरखास्त करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, कर्नल सोफिया कुरेशींच्या संदर्भात विजय शाह यांनी दिलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह आहे, ते अश्लीलता आणि जातीयवादाची पराकाष्ठा आहे. आज भारतीय जनता पक्षाने पुढे येऊन विजय शाह यांना मंत्रिपदावरून बरखास्त करावे. यापूर्वी त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबावरही भाष्य केले होते.
ज्यावर पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला होता. आज आपल्याला हे पाहावे लागेल की भारतीय जनता पक्षासाठी माजी मुख्यमंत्र्यांचे कुटुंब अधिक महत्त्वाचे होते की सोफिया कुरेशीसारखे लष्करी अधिकारी आणि सैनिक अधिक महत्त्वाचे आहेत. अशा विधानावर भारतीय जनता पक्ष काय निर्णय घेते ते पाहण्यासाठी आपण वाट पाहू. विजय शाह यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्याची आमची मागणी आहे.





