सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना करोनाची लागण; पोस्ट शेअर करत म्हणाल्या,”करोनाने” मला गाठलचं..”

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड कलाकार, मालिका विश्वातील अभिनेते-अभिनेत्री यांना करोनाची लागण झाली आहे. त्यातच नुकतेच बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धक आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्या नेहमी विविध पोस्ट टाकत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकंतच तृप्ती देसाई यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. अखेर “कोरोनाने” मला गाठलचं- #माझीटेस्ट #पॉझिटिव्हआली_आहे, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, चाहत्यांची भेटायला गर्दी परंतु नियमांचे पालन मी करीत होते….जेव्हा त्रास जाणवायला लागला त्यानंतर मात्र मी कोणालाच भेटले नाही. माझी तब्येत व्यवस्थित आहे ,काळजी करू नये सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सरकारचे सर्व नियम पाळा आणि कोरोना टाळा, असेही आवाहन तृप्ती देसाई यांनी केले आहे.





