पुणे जिल्हा | बी.एड.महाविद्यालयाचे समाजसेवा शिबिर उत्साहात

भिगवण, (वार्ताहर) – येथील लोकनेते शरदचंद्रजी पवार शिक्षणशास्त्र(बी.एड) महाविद्यालयाच्या वतीने कुंभारगाव (ता. इंदापूर) येथे समाजसेवा व ग्रामविकास शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरातून व्यक्तीमत्व विकसित होते. वेळेचे नियोजन, तडजोड, समाजसेवा या तीन घटकांचा विकास होतो. श्रमदानातून श्रमप्रतिष्ठा निर्माण होते. म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्राचार्या डॉ.उज्वला लोणकर यांनी सांगितले.
प्रथम वर्ष बी.एडच्या विद्यार्थ्यांनी या शिबिरात गावातील मंदिराची स्वच्छता, रस्त्यांची स्वच्छता केली तसेच वृक्षारोपणही करण्यात आले. गावकऱ्यांमध्ये अंधश्रद्धा, स्वच्छ्ता, मुलामुलींमधील भेदभाव, पर्यावरण रक्षण याबद्दल जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनी विविध समाज प्रबोधनपर पथनाट्य सादर केले. प्रा.अविनाश गायकवाड यांनी समाजसेवा शिबिराविषयी मार्गदर्शन केले. या शिबिराला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला लोणकर तसेच प्रा.रोकडे, प्रा.पिंगळे ग्रामस्थ, विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.





