…तर ते मंत्री तरी झाले असते का? प्रवीण दरेकरांचा माणिकराव कोकाटेंना टोला

भाजपात आला त्याला तिकीट मिळते. पण मला नाही मिळाले, कदाचित भाजपा पक्ष माझ्यासाठी लकी नव्हता, असे उद्गार कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात काढले. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी ते भाजपाच्या पायगुणामुळे मंत्री झाले आहेत. जर भाजपाचे सरकार आले नसते तर ते मंत्री तरी झाले असते का? याचे भान त्यांनी ठेवावे असा हल्लाबोल प्रवीण दरेकर यांनी केला.
संजय राऊत यांच्यावरही हल्लाबोल
पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांची जास्तच काळजी वाटते. संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांची वकिली कधीपासून करू लागले? उद्धव ठाकरे यांची काळजी घेण्याऐवजी ते आता शिंदे यांची काळजी घ्यायला लागले आहेत. निष्ठा नक्की कोणाकडे आहे? एकेकाळी त्यांची निष्ठा शरद पवार यांच्याकडे होती. आता त्याची टोपी ह्याला, ह्याची टोपी त्याला असा खेळ सुरू केला आहे. राऊत यांनी फुटकळ बोलणं बंद करावे. आमच्यात सगळं काही आलबेल, तुमचं तुम्ही पाहा, एकनाथ शिंदेंची काळजी करू नका, आम्ही सगळे एकत्र आहोत, असं प्रवीण दरेकर म्हणाले.
दरेकर म्हणाले, अशोक चव्हाण यांनी जी भूमिका मांडली आहे ती पक्षाची भूमिका नसून ती त्यांची वैयक्तिक भूमिका असू शकते. हेमंत पाटील यांनी त्यावर जुना निवाडा काढलाय तो देखील त्यांच्या पक्षाचा निर्णय नाही ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. जेव्हा तीन प्रमुख नेते एकत्र बसतील त्यावेळी ते निर्णय घेतील. त्यामुळे नेते काय म्हणतात याला काही अर्थ राहत नाही, असंही प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.





