“…तर मग महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का?” मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे वक्तव्य

C.P. Radhakrishnan | राज्यात सध्या हिंदी-मराठीच्या मुद्द्यावरून वातवरण तापले आहे. मुंबईत काही हिंदी भाषिकांना मराठी बोलता येत नाही म्हणून मारहाण करण्यात आल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. अशातच आता राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मराठी-हिंदी वादावर भाष्य केलं आहे. मराठी बोलता येत नाही म्हणून कुणी मारहाण केली, तर मला लगेच मराठी बोलता येईल का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील ‘महाराष्ट्र नायक‘ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी मराठी आणि हिंदी वादावर भाष्य केलं. त्यावेळी सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, भाषेच्या नावावर दहशत पसरवणं राज्यासाठी हितकारी नाही. या दहशतीमुळे महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? असा सवाल त्यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी तमिळ भाषा येत नाही म्हणून काही लोकांना मारहाण केल्याचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात मराठी बोलतं नाही तर मार खावा लागेल, हे मी पेपरमध्ये वाचत आहे. असाच वाद तामिळनाडूमध्ये झाला होता तेव्हा मी खासदार होतो. हायवेने जाताना रस्त्याच्या कडेला काही लोकांना मारहाण केली जात होती. ते पाहून मी माझ्या ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. मात्र, मला बघून मारहाण करणारे पळून गेले. मात्र ज्यांना मारलं होतं ते लोक तिथेच होते. यावेळी नेमकं काय झालं याची विचारना केली असता ते मला सर्व घटना हिंदीत सांगू लागले. पण मला हिंदी येत नसल्याने ते काय सांगत आहेत ते कळेना.
तेव्हा एका तमिळ व्यक्तीने सांगितलं की, त्यांना तामीळ येत नाही म्हणून लोकांना मारहाण केली आणि त्यांच्याकडे जबरदस्ती तामीळ बोलण्याचा आग्रह केला जात होता आणि त्यांना बोलताना येईना म्हणून मारहाण केली गेली. त्याप्रमाणे आता मला मराठी येत नाही म्हणून कुणी मारहाण केली तर मला लगेच मराठी बोलता येईल का? ज्या लोकांना मारहाण झाली होती त्यांची मी माफी मागितली, जेवायला पैसे दिले आणि त्यांना गाडीत बसवून मी निघून गेलो’, असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. C.P. Radhakrishnan |
दीर्घ काळासाठी महाराष्ट्राचे नुकसान करत आहोत
मी हा प्रसंग सांगतो आहे कारण जर अशा प्रकारे भाषेच्या नावे दहशत पसरवली जात असेल तर मग महाराष्ट्रात गुंतवणूकदार येतील का? अशा दहशतीमुळे आपण दीर्घ काळासाठी महाराष्ट्राचे नुकसान करत आहोत. महाराष्ट्र ही शाहू, फुले, आंबेडकर यांची भूमी आहे. त्यांचा वारसा पुढे नेताना आपण प्रत्येकाशी समानतेने वागून त्यांचा आदर केला पाहिजे. एखाद्या व्यक्तीला तुमची भाषा येत नसेल तर तुम्हाला त्याची भाषा यायला हवी, असा सल्लाही राज्यपालांनी दिला. C.P. Radhakrishnan |
मातृभाषेचा अभिमान बाळगत जास्तीत जास्त भाषा शिकले पाहिजे
‘मला मराठी येत नाही. परंतु मंत्र्यांचे चेहरे बघून मी त्यांचे चेहरे वाचून भावना जाणून घेत असतो. ते मला सोपे जाते. प्रत्येकाने आपापल्या मातृभाषेचा अभिमान बाळगत जास्तीत जास्त भाषा शिकले पाहिजे. आपल्याला आर्थिक विकास करायचा असेल तर आपसांत सद्भाव बाळगला पाहिजे,’ असेही राज्यपालांनी सांगितले. C.P. Radhakrishnan |
हेही वाचा:





