मग स्मारक का झाले नाही? संभाजीराजे छत्रपती यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबई – अरबी समुद्रामध्ये २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन पार पडले होते. मात्र, त्यानंतर अद्यापही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम झाले नसल्यामुळे आता स्वराज्य पक्षाचे नेते, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत.
आज ते स्मारकाची पाहणी करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी काही सवाल करत सरकारवर हल्लाबोल केला.
केंद्रात तुमचे सरकार, राज्यात देखील तुमचे सरकार, स्मारकाचे जलपूजनही तुम्हीच केले. मग स्मारक का झाले नाही?, असा सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी विचारला आहे.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, आम्ही कोणतेही आंदोलन करण्यासाठी मुंबईत आलेलो नाही. खऱ्या अर्थाने आपल्याला अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा विषय हा राज्यातील १३ कोटी जनतेपर्यंत घेऊन जायचा आहे. कोणत्याही प्रकारे आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही.
कायद्याच्या बाहेर जाऊन कोणतीही गोष्ट आपल्याला करायची नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. ते आपले गडकोट किल्ले व्यवस्थित राहिले पाहिजे. त्यामुळे माझा १५ ते २० वर्षांपासून प्रयत्न सुरु आहे.
रायगड किल्ल्यावर रायगड प्राधिकरण स्थापन झाले. त्यासाठी मी सरकारला भाग पाडले. ७५ वर्षांत पहिल्यांदा रायगड किल्ल्याचे सवर्धन सुरु झाले, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.





