“…तर “पठाण’ विरोधात आंदोलन’ – रामदास आठवले

पुणे : “शाहरुख खानच्या पठाण सिनेमाला आमचा विरोध नाही. मात्र गाण्यातील बेशरम हा शब्द काढला पाहिजे. कोणताही रंग बेशरम नसतो. बेशरम शब्द काढला नाही, तर आम्हीही आंदोलन करू,” असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.
पुण्यातील नवीन विश्रामगृहात येथे आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी “रिपाइं’ शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, परशुराम वाडेकर, प्रदेश उपाध्यक्ष असित गांगुर्डे, महिपाल वाघमारे, रोहिदास गायकवाड, अशोक कांबळे, संजय सोनवणे, विशाल शेवाळे, मोहन जगताप, बसवराज गायकवाड, निलेश आल्हाट, वीरेन साठे, यशवंत नडगम, श्याम सदाफुले, राजेश गाडे, अक्षय गायकवाड, आनंद लवटे, वैभव पवार, महादेव साळवे, जयदेव रंधवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले म्हणाले, “”कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येतील. स्तंभाजवळ सभा घेता येणार नाही, असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आमचा या निर्णयाला विरोध नाही. ज्यांना सभा घ्यायची ते आजुबाजूबाजूला घेऊ शकतात. याची परवानगी देण्यात यावी, याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत. तसेच विजयस्तंभ प्रकरणी दाखल केसेस मागे घ्याव्यात, अशी आमची मागणी आहे.”
चंद्रकांत पाटील यांनी चुकीची भाषा वापरली. मात्र त्यांनी याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. शाईफेक प्रकरणातील तरुणांना जामीन झालेला आहे. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनाही भेटणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.




