पुणे जिल्हा | …म्हणून महाराजांनी रयतेचे राज्य उभारले

लेण्याद्री, (वार्ताहर)- छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राज्यकारभाराप्रमाणे सरकारचा कारभार चालल्यास खर्या अर्थाने सुराज्य निर्माण होणार आहे. महाराजांनी देव, देश आणि धर्मासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करत रयतेचे राज्य उभारले. श्रीराम मंदिराची उभारणी ही आपल्या प्रत्येकाची अभिमानाची बाब आहे. छत्रपतींचे विचार केवळ मनातच नाहीत तर रक्तातच आहेत. तसेच तिथीनुसार जन्मोत्सवाच्या परंपरा कायम राखण्याचे आवाहन आमदार श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
किल्ले शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने तिथीनुसार आयोजित शिवजयंती उत्सवप्रसंगी आमदार भोसले गुरुवारी (दि. 28) बोलत होते. याप्रसंगी तालुक्याचे आमदार अतुल बेनके, आरमार प्रमुख सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे सरखेल, शिवनेरी स्मारक समितीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, कार्याध्यक्ष मधुकर काजळे, शिवाई देवी ट्रस्टचे अध्यक्ष विकास दुराफे, बाजार समितीचे उपसभापती प्रकाश ताजणे, राजेंद्र भगत, रमेश कर्पे, शरद चौधरी, मकरंद पाटे आणि शेकडो शिवभक्त उपस्थित होते.
दरम्यान सकाळी 7 वाजता गडावरील शिवाई मातेस आमदार श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले छत्रपती व आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर प्रथेनुसार पारंपरिक वाद्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वरसुबाई आदिवासी महिला लेझीम पथकाने सादरीकरण केले.
तद्नंतर शिवजन्मस्थानी पारंपरिक पद्धतीने महिलांनी पाळणा गायिला. ध्वजारोहण झाल्यानंतर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पारंपरिक पोवाडे गायले गेले. त्यानंतर सोनाली पारधी, उषा वनघरे, लता उंडे, यमुना शेळकंदे यांना मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.





