Stock Market: सरकारने तंबाखूजन्य पदार्थांवरील जीएसटी (GST) २८ टक्क्यांवरून थेट ४० टक्के करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही, शेअर बाजारात सिगरेट कंपन्यांच्या समभागांनी बुधवारी मोठी झेप घेतली आहे. आयटीसी (ITC), गॉडफ्रे फिलिप्स इंडिया आणि व्हीएसटी इंडस्ट्रीज यांसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये २० टक्क्यांपर्यंतची जबरदस्त वाढ नोंदवण्यात आली. वाढलेली उत्पादन शुल्क (Excise Duty) ग्राहकांकडून वसूल करण्यासाठी कंपन्यांनी सिगरेटच्या किमतीत वाढ केल्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून आला. गॉडफ्रे फिलिप्सच्या शेअरला अप्पर सर्किट – बुधवारच्या सत्रात ‘गॉडफ्रे फिलिप्स इंडिया’च्या शेअरने गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला. बीएसईवर (BSE) हा शेअर १९.९३% वाढून ₹२,४७९.७५ वर बंद झाला. व्यवहारादरम्यान या शेअरने ₹२,४८१.३० ची आपली वरची मर्यादा (Upper Price ) गाठली होती. तसेच, व्हीएसटी इंडस्ट्रीजचा शेअर २.९७% वाढून ₹२४६.५५ वर, तर ITC चा शेअर सलग तिसऱ्या दिवशी मजबुती दाखवत २.२१% वाढीसह ₹३३२.५० वर स्थिरावला. नेमकी तेजी कशामुळे? सरकारने १ फेब्रुवारीपासून तंबाखू उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि वाढीव जीएसटी लागू केला आहे. या निर्णयामुळे सुरुवातीला या क्षेत्रात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, ‘जिओजित इन्व्हेस्टमेंट्स’चे रिसर्च हेड विनोद नायर यांनी स्पष्ट केल्यानुसार, कंपन्यांनी अलीकडेच आपल्या प्रमुख ब्रँड्सच्या किमती वाढवल्या आहेत. यामुळे कराचा बोजा ग्राहकांकडे सरकवून कंपन्यांनी आपला नफा सुरक्षित केला आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास परतला आहे. तज्ज्ञांचे मत: “डिसेंबर तिमाहीचे निकाल पाहता, सिगरेटची मागणी घटलेली नाही. करांमुळे आलेली घसरण ही तात्पुरती होती. या कंपन्यांकडे किमती वाढवण्याची जबरदस्त ताकद (Pricing Power) असल्याने उच्च कर दर असूनही त्या आपला नफा टिकवून ठेवू शकतात.” – विनोद नायर, जिओजित इन्व्हेस्टमेंट्स. मागणीवर परिणाम होण्याची शक्यता कमी – रिटेल किमती वाढल्यामुळे सिगरेटच्या विक्रीवर (Volume) तात्पुरता परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात असली तरी, ऐतिहासिक अनुभवानुसार सिगरेटची मागणी स्थिर राहते. बुधवारी शेअर बाजारातही एकंदर सकारात्मक वातावरण होते; बीएसई सेन्सेक्स २८३.२९ अंकांनी वधारून ८३,७३४.२५ वर बंद झाला.