Smriti Irani : १८०० रुपयांत फरशी पुसणारी मुलगी ते १४ लाख मानधन घेणारी सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री

Smriti Irani: एकेकाळी महिन्याला फक्त १८०० रुपये पगारावर फरशी पुसण्याचं आणि भांडी घासण्याचं काम करणाऱ्या स्मृती इराणी आज भारतीय टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री ठरल्या आहेत. आज त्या एका एपिसोडसाठी तब्बल १४ लाख रुपये घेतात. स्मृतींचा हा प्रवास संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे.
स्मृती इराणी यांचा जन्म १९७६ मध्ये दिल्लीत झाला. घरची परिस्थिती कठीण असल्याने कॉलेज सोडून त्यांनी मॅकडोनाल्डमध्ये क्लिनर म्हणून नोकरी केली. महिन्याला १८०० रुपये पगारावर त्या सफाई करायच्या. यापूर्वी त्या मिस इंडिया स्पर्धेत टॉप १० फायनलिस्टमध्ये पोहोचल्या होत्या. पण आयुष्यात बदल घडवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. एअर होस्टेसच्या नोकरीसाठी त्यांनी प्रयत्न केले, पण ‘पर्सनॅलिटी’ नसल्याचे कारण देत त्यांना नकार मिळाला.
यानंतर स्मृती मालिकांच्या ऑडिशनला जाऊ लागल्या. त्यावेळी त्यांना ‘हम पांच’ मध्ये भूमिका मिळाली. मात्र त्यांचं खरं आयुष्य बदललं ते ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेमुळे. ही भूमिका त्यांना प्रत्यक्षात एकता कपूरच्या आईमुळे मिळाली. ज्योतिषाच्या सांगण्यावरून एकताने स्मृती यांना महत्त्वाची भूमिका दिली आणि त्या घराघरात ‘तुलसी’ म्हणून पोहोचल्या.
स्मृती आठ वर्षं या मालिकेत झळकल्या आणि भारतीय टेलिव्हिजनवर राज्य केलं. सुरुवातीला दिवसाला १२०० रुपये मिळणारी स्मृती, नंतर १८०० रुपये दिवसाला मिळू लागल्यावर तिला वाटलं होतं की आयुष्यातली लॉटरी लागली आहे. पण हा फक्त तिच्या प्रवासाचा प्रारंभ होता.
स्मृतींनी या काळात झुबिन इराणीशी लग्न केलं आणि दोन मुलांना जन्म दिला. नंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. २०११ मध्ये त्या राज्यसभेत गेल्या. २०१९ मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांचा पराभव केला आणि मोठ्या चर्चेत आल्या. त्यांनी महिला आणि बालविकास, माहिती आणि प्रसारण यासह अनेक मंत्रालयांचा कारभारही सांभाळला.
२५ वर्षांनंतर, २०२५ मध्ये स्मृती पुन्हा एकदा ‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’मधून छोट्या पडद्यावर परतल्या आहेत. आज त्या टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्री ठरल्या आहेत. कधी महिन्याला १८०० रुपये कमावणाऱ्या स्मृती आता एका एपिसोडसाठी तब्बल १४ लाख रुपये घेतात.
संघर्ष, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर स्मृती इराणी यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्या आज लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान बनल्या आहेत.



