Smart Meter: ग्राहकांच्या खिशाला कात्री! प्री-पेड मीटरमुळे नागरिकांमध्ये संताप

Smart Meter: उत्तर प्रदेश वीज महामंडळाने बलिया जिल्ह्यात पोस्ट-पेड वीज मीटर बदलून स्मार्ट प्री-पेड मीटर बसवले आहेत. महामंडळाचा दावा आहे की, यामुळे वीज व्यवस्थेत पारदर्शिता येईल आणि ग्राहकांना २ टक्के सवलत मिळेल. पण प्रत्यक्षात ग्राहकांवर जुन्या थकबाकी आणि नवीन रिचार्जचा एकत्रित बोजा पडत आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
महामंडळाने स्पष्ट केले की, यापूर्वी जमा केलेली हमी रक्कम (Security amount) थकित देयकात समायोजित केली जाईल किंवा प्री-पेड शिल्लकमध्ये (Pre-Paid Balance) जोडली जाईल. परंतु, जोपर्यंत थकबाकी पूर्ण भरली जात नाही, तोपर्यंत प्रत्येक रिचार्जमधून सक्तीने कपात केली जाईल. घरगुती ग्राहकांकडून १० ते २५ टक्के आणि इतर गटांमधून थेट २५ टक्के रक्कम प्रत्येक रिचार्जवर कापली जाईल. शिवाय, थकबाकीवर उशीरा भरण्याचा अधिभारही स्वतंत्रपणे भरावा लागेल.
महामंडळाने ३० दिवसांचा सवलतीचा कालावधी आणि शिल्लक ( Balance) संपल्यास तीन दिवसांचे आपत्कालीन पत (Credit) देण्याचे जाहीर केले आहे. तसेच, एसएमएस आणि मोबाइल ॲपद्वारे ग्राहकांना शिल्लक, वापर आणि रिचार्ज यांचा तपशील मिळेल, असा दावा आहे. पण ग्राहक याला सवलत न मानता सक्ती मानत आहेत.
येथील सिकंदरपूर परिसरातील अनेक ग्राहकांनी या व्यवस्थेला जनतेच्या खिशावरील थेट लूट संबोधले आहे. ग्राहक दिग्विजय सिंग म्हणाले, “आधीच महागडी वीज आणि आता प्रत्येक रिचार्जवर कपात. ही तर सरळ लूट आहे.” तर अखिलेश सिंग गुड्डू म्हणाले, “शिल्लक (बॅलन्स) संपण्याची भीती कायम राहते. यामुळे लहान ग्राहकांना अधिक त्रास होत आहे.”
वीज तज्ज्ञांचे मत आहे की, जर महामंडळ खरोखर ग्राहक हिताचे असेल, तर त्याने आधी थकबाकीचा प्रश्न स्पष्टपणे निकाली काढायला हवा. रिचार्जवर कपात करण्याच्या या व्यवस्थेमुळे ग्राहक त्रस्त झाले असून, याविरोधात संतापाची लाट उसळत आहे.


