Smart cooking: वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा खर्च झपाट्याने वाढत असताना पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी आता सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. ‘गॅस बचती’चे नवे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवर घरगुती उपायांचे व्हिडिओ आणि संदेश मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. स्वयंपाकघरातील खर्च कमी करण्यासाठी ‘स्मार्ट कुकिंग’चा ट्रेंड वेगाने वाढताना दिसत आहे. उद्योग नगरी, कामगार नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये मध्यमवर्गीय आणि कामगार कुटुंबांची संख्या मोठी आहे. वाढत्या गॅस दरांमुळे महिन्याचे बजेट विस्कटत असल्याने नागरिक आता पर्यायी उपायांकडे वळले आहेत. विशेषतः गृहिणी आणि तरुण वर्ग सोशल मीडियावर उपलब्ध टिप्सचा प्रत्यक्ष वापर करून पाहत असल्याचे चित्र आहे. इंडक्शन शेगडीचा वापर वाढला दरम्यान, काही भागांत गॅस वितरणात उशीर होत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांनी इंडक्शन शेगडीचा वापर वाढवला आहे. चहा, पाणी उकळणे किंवा किरकोळ पदार्थ बनवण्यासाठी विजेचा वापर केल्याने गॅसचा वापर कमी होऊन सिलिंडर अधिक काळ टिकत असल्याचे नागरिक सांगत आहेत. १५ टक्के गॅस बचत शक्य सोशल मीडियावर सध्या ‘सेव्ह गॅस’ मोहिमेसारखीच चळवळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. कडधान्ये आधी भिजवून ठेवणे, फ्रीजमधील अन्न थेट गरम न करता खोलीच्या तापमानावर आणणे, तसेच स्वयंपाक करताना सर्व साहित्य आधीच तयार ठेवणे अशा छोट्या उपायांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते, या साध्या सवयी अंगीकारल्यास महिन्याला १० ते १५ टक्क्यांपर्यंत गॅस बचत शक्य आहे. शहरातील अनेक कुटुंबांनी कुकरचा वापर वाढवण्यावर भर दिला आहे. पातेल्यापेक्षा कुकरमध्ये अन्न लवकर शिजत असल्याने इंधनाची बचत होते. तसेच भांड्यांवर झाकण ठेवणे, बर्नर स्वच्छ ठेवणे आणि निळ्या ज्वालेकडे लक्ष देणे या गोष्टींचाही वापर वाढला आहे. तज्ज्ञांनीही नागरिकांना गॅस बचतीबाबत सजग राहण्याचे आवाहन केले आहे. “स्वयंपाक करताना वेळ आणि उष्णतेचा योग्य वापर केला, तर इंधनाची बचत मोठ्या प्रमाणात होऊ शकते. तसेच गॅस पाईप आणि रेग्युलेटरची नियमित तपासणी केल्यास गळती टाळता येते,” असे मत एलपीजी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले. महागाईच्या वाढत्या ताणात पिंपरी-चिंचवडकरांनी सोशल मीडियाच्या मदतीने गॅस बचतीचा मार्ग शोधण्यास सुरुवात केली असून, ‘स्मार्ट कुकिंग’ ही आता केवळ ट्रेंड नसून गरज बनली आहे. ‘पूर्वी आम्ही रोजच्या सवयीप्रमाणे स्वयंपाक करत होतो. आता मात्र प्रत्येक गोष्ट नियोजन करूनच करतो. भाजी, कडधान्ये आधीच तयार ठेवतो आणि शक्य तिथे इंडक्शन वापरतो. त्यामुळे गॅसचा वापर कमी झाला आहे.’- उज्वला गोडसे, चिखली अशी करा गॅसची बचत – स्वयंपाकापूर्वी सर्व साहित्य तयार ठेवा – कुकरचा जास्तीत जास्त वापर करा – भांड्यांवर झाकण ठेवून शिजवा – बर्नर नियमित स्वच्छ ठेवणे आवश्यक – कडधान्ये आधी भिजवून वापरा – कमी आचेवर शिजवण्याची सवय लावा – इंडक्शन शेगडीचा पूरक वापर करा – गॅस गळती नियमित तपासणी करा – एकाचवेळी अनेक पदार्थ शिजवा – फ्रिजमधील पदार्थ आधी बाहेर ठेवा Pimpri News : कर संकलन विभागाचा पुन्हा एकदा उच्चांक; प्रतिकूल परिस्थितीत ९४७ कोटींची झेप