हरियाणात भाजप आणि काँग्रेससाठी छोटे पक्ष, अपक्ष ठरणार डोकेदुखी

नवी दिल्ली –भाजप आणि कॉंग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांकडे यावेळीही हरियाणातील सत्तेचे प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जात आहे. मात्र, छोटे पक्ष आणि अपक्षांचा थर्ड फॅक्टर त्या दावेदारांची राजकीय समीकरणे बिघडवणारा ठरू शकतो. छोटे पक्ष, अपक्षांना लक्षणीय पाठिंबा मिळाल्यास भाजप आणि कॉंग्रेसची डोकेदुखी वाढू शकते.
हरियाणात १ ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या राज्यात भाजप सत्तेवर आहे. तर, कॉंग्रेस प्रमुख विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. त्या पक्षांमध्येच खरी लढत होणार असल्याचे मानले जाते. काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीने त्या चित्रावर जवळपास शिक्कामोर्तब केले.
हरियाणात लोकसभेच्या एकूण १० जागा आहेत. त्यातील निम्म्या-निम्म्या जागा भाजप आणि कॉंग्रेसच्या वाट्याला आल्या. अर्थात, तो निकाल भाजपच्या गोटात चिंता निर्माण करणारा आणि कॉंग्रेसचा उत्साह वाढवणारा ठरला. भाजपने २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत हरियाणातील सर्व जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजप त्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही.
हरियाणातील लोकसभा निवडणूक कॉंग्रेस आणि आपने हातमिळवणी करून लढवली. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात विरोधकांच्या मतांचे एकत्रीकरण होऊन भाजपला फटका बसला. मात्र, विधानसभा निवडणुकीत तसे घडणार नाही. तिसरा घटक असणारे छोटे पक्ष, अपक्ष अधिक मतं मिळवतील. त्यामुळे विरोधकांच्या मतांचे विभाजन होईल, असे भाजपला वाटते.
तर, भाजपपासून लोकसभा निवडणुकीत निर्णायक प्रमाणात मतदार दुरावले. ती स्थिती विधानसभा निवडणुकीत आणखीच भक्कम बनेल, असा विश्वास कॉंग्रेसला वाटत आहे. लोकसभा निवडणुकीवेळचा मोदी फॅक्टर विधानसभा निवडणुकीत नसेल असेही कॉंग्रेसचे म्हणणे आहे.
जननायक जनता पक्ष (जेजेपी), भारतीय राष्ट्रीय लोक दल (आयएनएलडी), बसप आणि आप हे राजकीय प्रभावाचा विचार करता हरियाणातील छोटे पक्ष आहेत. आयएनएलडी आणि बसपने आघाडी केली आहे. तर, लोकसभा निवडणुकीवेळी एकत्र लढलेले कॉंग्रेस आणि आप विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे लढणार आहेत.
विरोधकांच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आणि कॉंग्रेसमधील गटबाजी याबाबी भाजपला पथ्यावर पडणाऱ्या वाटत आहेत. तर, भाजप सलग १० वर्षांपासून हरियाणात सत्तेवर आहे. त्यामुळे त्या पक्षासाठी प्रस्थापितविरोधी लाट प्रतिकूल ठरू शकते, अशी कॉंग्रेसला आशा आहे. हरियाणात विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. त्या बहुतांश जागांसाठी अटीतटीच्या लढती होतील, असे सध्याचे चित्र आहे.





