World Mosquito Day: डास छोटा, धोका मोठा! डेंग्यूसह या ‘5’ गंभीर आजारांपासून सावधान
World Mosquito Day दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी जागतिक डास दिन साजरा केला जातो. डासांमुळे पसरणाऱ्या आजारांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि डासांपासून बचाव करण्याचे महत्त्व सांगणे हा या दिवसाचा उद्देश आहे. डासांच्या वेगवेगळ्या प्रजातींमुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात.

World Mosquito Day: पावसाळा आणि दमट हवामान सुरू झालं की डासांचा त्रास वाढतो. घराच्या आसपास साचलेलं पाणी, ओलसर जागा आणि वाढलेली आर्द्रता यामुळे डासांची संख्या वाढण्याची शक्यता असते. डासांचा आकार छोटा असला तरी त्यांच्या चाव्यामुळे काही गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.
दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी जागतिक डास दिन साजरा केला जातो. डासांमुळे पसरणाऱ्या आजारांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि डासांपासून बचाव करण्याचे महत्त्व सांगणे हा या दिवसाचा उद्देश आहे. डासांच्या वेगवेगळ्या प्रजातींमुळे वेगवेगळे आजार होऊ शकतात.
1. डेंग्यू
डेंग्यू हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. संक्रमित एडीस डासाच्या चाव्यामुळे त्याचा प्रसार होतो. पावसाळ्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असते. अचानक तीव्र ताप येणे, डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, स्नायू आणि सांधेदुखी, अशक्तपणा, मळमळ आणि त्वचेवर पुरळ ही डेंग्यूची सामान्य लक्षणे आहेत.
काही वेळा डेंग्यू गंभीर स्वरूप धारण करू शकतो. पोटात तीव्र दुखणे, सतत उलट्या होणे, नाक किंवा हिरड्यांमधून रक्त येणे, प्रचंड अशक्तपणा किंवा अस्वस्थता जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घेणे गरजेचे आहे.
2. मलेरिया
मलेरिया हा संक्रमित मादी अॅनोफिलीस डासाच्या चाव्यामुळे होतो. तापासोबत थंडी वाजणे, जोरदार कंप सुटणे आणि त्यानंतर घाम येणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.
याशिवाय डोकेदुखी, शरीरदुखी, थकवा आणि काही वेळा मळमळ होऊ शकते. मलेरियाकडे दुर्लक्ष केल्यास काही प्रकारांमध्ये गंभीर गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे लक्षणे जाणवल्यास तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणे महत्त्वाचे आहे.
)
World Mosquito Day
3. चिकनगुनिया
चिकनगुनियाचाही प्रसार प्रामुख्याने एडीस डासांमुळे होतो. अचानक ताप येणे आणि सांध्यांमध्ये तीव्र वेदना होणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. हात-पायांच्या सांध्यांमध्ये वेदना, सूज, डोकेदुखी, स्नायूदुखी, थकवा आणि त्वचेवर पुरळ येऊ शकतो. अनेक रुग्ण काही काळात बरे होतात. मात्र काही जणांमध्ये सांधेदुखी दीर्घकाळ राहू शकते.
4. झिका व्हायरस
झिका विषाणूचाही प्रसार संक्रमित एडीस डासांमुळे होतो. अनेक लोकांमध्ये त्याची लक्षणे सौम्य असतात किंवा दिसतही नाहीत. हलका ताप, त्वचेवर पुरळ, डोळे लाल होणे, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी तसेच अशक्तपणा अशी लक्षणे दिसू शकतात.
गर्भवती महिलांसाठी झिका संसर्ग विशेष चिंतेचा विषय आहे. गर्भावस्थेत संसर्ग झाल्यास बाळाच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे संबंधित लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
5. जपानी एन्सेफलायटिस
जपानी एन्सेफलायटिस हा डासांद्वारे पसरणारा गंभीर विषाणूजन्य आजार आहे. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, उलट्या आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसू शकतात. काही गंभीर रुग्णांमध्ये मेंदूवर परिणाम होऊ शकतो. गोंधळ होणे, झटके येणे, बेशुद्धावस्था, मान आखडणे किंवा चेतनेमध्ये बदल होणे अशी गंभीर लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे आहे. मुलांमध्ये या आजाराचा धोका गंभीर असू शकतो.
डासांपासून बचाव कसा कराल?
घरात किंवा परिसरात पाणी साचू देऊ नका. पाण्याच्या टाक्या आणि भांडी झाकून ठेवा. घरात डास प्रतिबंधक उपायांचा वापर करा आणि शक्य असल्यास पूर्ण अंग झाकणारे कपडे वापरा. आजाराची लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या.





