लघुउद्योजकांना 9.25 टक्के दराने कर्ज मिळणार ; क्रेडिट गॅरंटी योजनेची अंमलबजावणी या आठवड्यातच

नवी दिल्ली- केंद्र सरकारने लघुउद्योजकांना तीन लाख कोटी रुपयाचे कर्ज विनातारण देण्याची घोषणा केली आहे. या योजनेची अंमलबजावणी लगेच होण्याची शक्यता असून या योजनेअंतर्गत लघुउद्योजकांना 9.25 टक्के दराने कर्ज मिळणार आहे.
सध्या बॅंकाकडून लघुउद्योजकांना 9.50 टक्के ते 17 टक्के व्याज दराने कर्ज दिले जाते. त्याचबरोबर लघुउद्योजकांना एनबीएफसीकडून मिळणाऱ्या कर्जावरील व्याजदर 14 टक्के पेक्षा जास्त राहणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
लघु उद्योजकांनी या अगोदर जेवढे कर्ज घेतले असेल त्या कर्जाच्या 20% नवीन कर्ज उपलब्ध होणार आहे. यासाठी 29 फेब्रुवारी 2020 ही लघुउद्योजकांकडील पूर्वीच्या कर्जाची तारीख गृहीत धरणार धरण्यात येणार आहे. ज्या लघु उद्योगाची उलाढाल 100 कोटी पर्यंत आहे आणि ज्यांच्याकडे 25 कोटी रुपयांची थकबाकी आहे अशा उद्योगांना एक कर्ज मिळणार आहे. याचा फायदा देशातील 45 लाख लघु उद्योगांना मिळणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
या योजनेनुसार दिलेले कर्ज चार वर्षाच्या मुदतीचे असेल. त्याचबरोबर पहिल्या एक वर्षात या कर्जाचा हप्ता द्यावा लागणार नाही. 31 ऑक्टोबरपर्यंत या योजनेअंतर्गत कर्जासाठी लघुउद्योजकांना अर्ज करता येईल. लघु उद्योगांचे राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान 28 टक्के असून निर्यातीत या क्षेत्राचा वाटा 40 टक्के आहे. या क्षेत्रात 11 कोटी लोक काम करतात.
त्यामुळे या क्षेत्राला सवलतीसाठी प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. त्याचबरोबर या उद्योगांना भांडवल उभारणीत मदत व्हावी याकरिता हे उद्योग शेअर बाजारावर नोंदल्यास लघुउद्योग मंत्रालयाकडून सुरुवातीच्या काळात 50 हजार कोटी रुपयांचे शेअर विकत घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर या उद्योगांची व्याख्या बदलून अधिक उलाढालीच्या उद्योगाला लघुउद्योग समजले जाणार आहे. सरकारी विभाग 200 कोटी रुपयापर्यंतची खरेदी लघुउद्योगाकडून करणार आहेत.





