पोलिसांकडून संगमनेरमधील कत्तलखाने उद्धवस्त

संगमनेर – शहरात मोठ्या प्रमाणात गोवंश कत्तल होत असल्याची माहिती गुप्त खबऱ्याकडून मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी कर्मचाऱ्यांना जमजम कॉलनीत पाठवून तब्बल 2 हजार 900 किलो गोमांससह 6 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. यात तीन बड्या कसायांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दैनिक “प्रभात’च्या कसायांच्या वेळेत बदल झाल्याच्या वृत्तानंतर बुधवारी (दि.11) पहाटे ही कारवाई करण्यात आली.
पोलीस नाईक शामराव हासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस पथक रात्री गस्त घालून घरी येत असताना पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना एका गुप्त बातमीदाराकडून जमजम कॉलनी येथे काही इसम अवैधपणे गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करीत असल्याची तसेच गोमांस विक्री करता गाडीत भरून घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लगेचच सहाय्यक पोलीस निरीक्षक माळी यांच्यासह काही कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी पाठविण्यात आले. साधारणपणे साडेपाच वाजता जमजम कॉलनी गल्ली क्रमांक सहा येथे पोहोचल्यानंतर हिरव्या रंगाची संशयित ओमनी गाडी (क्र.एम एच 04 ए डब्ल्यू 3164) ही गाडी दिसून आली. या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये गोवंश जातीचे जनावरांचे कत्तल केलेले मांस मिळून आले. म्हणून बाजूचे भंगारच्या दुकानाजवळ एका पत्राच्या शेडची तपासणी केली असता एक लाख 80 हजार रुपये किमतीचे 900 किलो गोवंश जातीचे मांस आढळून आले. तर 50 हजार रुपये किमतीची हिरव्या रंगाची ओमनी गाडी आणि त्यामध्ये चाळीस हजार रुपये किलोचे मांस असा दोन लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. तसेच ओमनी चालक पत्र्याचे शेड मालक व जागा मालक यांनी तिथून पळ काढला.
त्याचबरोबर जमजम कॉलनी परिसरातील इतर ठिकाणी संशयित कत्तलखाने चेक केले असता सरकार लॉन्सजवळ निळ्या रंगाच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केलेले मांस आढळून आले. साधारण चार लाख रुपये किमतीचे दोन हजार किलो गोमांस मिळून आले. असा सहा लाख 70 हजार रुपये किमतीच्या मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तर नवाज कुरेशी, जब्बार पटेल आणि वाहिद कुरेशी (सर्व रा.संगमनेर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दैनिक “प्रभात’ने संगमनेरात कत्तलखाने सुरूच या मथळ्याखाली कसायांची गोवंश कत्तल करण्याची वेळ बदलली असून पहाटेच्या वेळी झाली असल्याचे स्पष्ट लिहिले होते. या वृत्तानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी वृत्ताची दखल घेत जवळपास 3000 किलो गोमांस पकडून तीन मोठ्या कसायांवर गुन्हे दाखल करून त्यांचे जेसीबीच्या साहाय्याने त्यांचे वाडे नष्ट करून मोठी कारवाई केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.





