Slapping incident : अत्याचार पीडित ‘त्या’ विद्यार्थ्याला दत्तक घेण्याची केरळ सरकारने दर्शवली तयारी

तिरुअनंतपुरम :- उत्तर प्रदेशातील एका शाळेतील शिक्षिकेने क्षुल्लक कारणावरून एका मुस्लीम विद्यार्थ्याला अन्य विद्यार्थ्यांकरवी मारहाण करण्याचा प्रकार घडला आहे. या पीडित विद्यार्थ्याला केरळमधील डाव्या आघाडीच्या सरकारने दत्तक घेण्याची तयारी दर्शवली आहे.
केरळचे शिक्षणमंत्री व्ही. शिवनकुट्टी म्हणाले की, जर त्याचे पालक सहमत असतील तर राज्य सरकार मुलाला सर्वोत्तम शिक्षण देईल. या मुलाला दत्तक घेऊन त्याला उत्तम शिक्षण देण्यास आमचे सरकार तयार आहे, असे शिवणकुट्टी यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
केरळचे लोक धर्मनिरपेक्ष मूल्यांचे रक्षण करण्यासाठी झटत असल्याचे सांगून मंत्री म्हणाले की, हिंसाचारग्रस्त मणिपूर राज्यातील एका मुलाला सध्या केरळच्या शाळेत शिक्षण दिले जात आहे. ते म्हणाले की केरळ राज्य पुरोगामी पद्धतीने विचार आणि कार्य करते.
शिवनकुट्टी यांनी काल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या थप्पड प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका शाळेतील शिक्षिका तिच्या विद्यार्थ्यांना एका मुस्लीम मुलाचा गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे त्याला थप्पड मारण्यास सांगताना दिसत आहे, या मुलाच्या धर्माबद्दल या शिक्षिकेने आक्षेपार्ह उद्गारही काढले आहेत.





