उरुळी कांचन येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या सहा जणांना पिकअपची जोरदार धडक; दोघांचा मृत्यू, चोघे गंभीर

उरुळी कांचन : पुणे- सोलापूर महामार्गावर वाहनाची वाट पाहत बसलेल्या सहा जणांना एका भरधाव पिकअप चालकाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी (ता. 02) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील तळवडी चौकात हा अपघात झाला.
या अपघातात अशोक भीमराव (वय- 25, रा. बसनाळ सावली बिदर कर्नाटक), व मेहबूब रहमान मियाडे (वय-67, रा. माकर वस्ती सहजपुर ता. दौंड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर या अपघातात भारती लक्ष्मण बापूराव रा. आश्रम रोड, उरुळी कांचन, ता. हवेली), मैनुद्दीन लालमिया तांबोळी (वय 67, रा. आंबा पिंपळगाव, लातूर), वैशाली भागवत बनसोडे (वय 40,रा. सोरतापवाडी ता. हवेली, पुणे), भागवत बनसोडे वय-45, हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात करून पळून गेलेल्या आरोपी चालकाला उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतले असून शशिकांत रोहिदास पवार (वय- 24, रा. अकलूज, ता. माळशिरस, जिल्हा सोलापूर) असे चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या दिशेने जाण्यासाठी सहा जण तळवडी चौकात वाहनाची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे होते. याच दरम्यान सोलापूर च्या दिशेने एक पिकअप वाहन निघाले होते.
यावेळी चौकात उभे राहिलेल्या चौघांना पिकअप चालकाने जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की एकाचा जागीच मृत्यू झाला तर तर उर्वरित पाच जणांना गंभीर दुखापत झाली. जखमींना लाईफ केयर रुग्णवाहिकेतून सिद्धिविनायक हॉस्पिटल हा ठिकानी पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातात पिकअप चालक हा सोलापूरच्या बाजूने न थांबता पळून गेला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अक्षय बंटी कांचन ओंकार रानवडे, तुषार पांगारे, प्रथमेश जगताप, आर्यन जगताप आदींनी तातडीने घटनास्थळी पोहोचले व तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या अपघात ग्रस्त पिकअप चालकाला उरुळी कांचन पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली आहे.





