बांगलादेशात रोहिंग्यांच्या दोन गटातील चकमकीत सहा जण ठार

ढाका – बांगलादेशातील कॉक्स बजार जिल्ह्यात रोहिंग्य मुस्लिमांची जी वस्ती आहे तेथे त्यांच्याच दोन गटात आज झालेल्या चकमकीत सहा रोहिंग्य मुस्लिम ठार झाले. त्यांच्यात गोळीबाराच्याही घटना घडल्या आहेत.
कोणत्या कारणावरून ही चकमक झाली याची माहिती अधिकृत सूत्रांकडून अजून मिळालेली नाही. पण स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या भागात मादक द्रव्यांचा व्यापार करणाऱ्या ज्या टोळ्या तयार झाल्या आहेत त्यावरील वर्चस्ववादातून ही चकमक झाली आहे.
चकमकीच्या ठिकाणी चार जण ठार झाले आणि अन्य दोन जखमींचे रूग्णालयात निधन झाले. रोहिंग्य मुस्लिमांना म्यानमार मधून हाकलून देण्यात आल्यानंतर लाखोंच्या संख्येने ते बांगलादेशात स्थायिक झाले आहेत; तेथे त्यांच्यासाठी बांगला सरकारने जे कॅम्प उघडले आहेत तेथे त्यांनी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवसाय सुरू केले आहेत असा बांगला सरकारचा आरोप आहे.
ते लोक म्यानमार मधून मादकद्रव्ये आयात करतात, अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यातही त्यांचा सहभाग असतो असे बांगलादेश सरकारचे म्हणणे आहे. काहीं दिवसांपुर्वीच रोहिंग्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीचीच या वस्तीत हत्या झाली होती. ऑगस्ट 2017 पासून सुमारे सात लाख रोहिंग्य निर्वासित बांगलादेशात वास्तव्याला आले आहेत.





