Newasa News : सहा अंध-अपंगांनी शारीरिक व्यंगाचे रडगाणे न गाता केली जीवनगाणे गाण्यास सुरुवात !

नेवासा : नियतीने आम्हाला जन्मताच अपंग केले असले तरी आम्ही मात्र मनाने अजिबात अपंग नसून या संघर्षमय जीवनाच्या वाटचालीत आम्हाला जगण्यासाठी जनता – जनार्धनाचा पाठींबा मिळत असल्यामुळे एक प्रकारचे आणखी बळच मिळत असून आम्ही जन्मताच अंध – अपंग असून आम्हाला कोणीही नाही,तुम्हीच आमचे मायबाप आहात? असे भावनिक उद्गगार पुणे निगडी येथील १२ अंधांचा संभाळ करणाऱ्या अंबादास मंडलिक यांनी दैनिक प्रभात’शी बोलतांना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात रविवार (दि.१२) रोजी राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राजमुद्रा चौकासमोर सुमारे सहा अंध महीला – पुरुष अपंग मंडळी चौकाशेजारी बसून अतिशय सुमधुर गोड आवाजात आणि संगिताच्या तालावर अनेक धार्मिक गाणे – पोवाडे म्हणून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या अंध – अपंगांच्या कला अविष्काराकडे साहजिकच नेवासा फाटा येथील अनेकांचे लक्ष वेधून घेतलेले होते.
आजच्या जमान्यात प्रत्येकालाच काही ना काही अडचणी असतात? त्या अडचणींवर मात करून यश मिळविणारे बाेटावर मोजण्याइतकेच काही हरहुन्नरी व्यक्ती असतात? अशाच प्रकारे अंध आणि अपंग असणाऱ्या पुणे निगडी येथील या सहा अंध-अपंगांनी आपल्या शारीरिक व्यंगाचे रडगाणे न गाता त्यावर मात करत जीवनगाणे गाण्यास सुरुवात केलेली आहे.
राज्यातील बाजारपेठ,बसस्थानकांसह गर्दीच्या ठिकाणी आणि धार्मिक उत्साहात सामाजिक,देशभक्ती,राष्ट्रीय गीतांचे गायन करून त्यांनी समाजात एकप्रकारे देशभक्तीचे स्फुल्लिंग पेटविण्याचे काम करत असून या गायनातून सहा जणांना जगण्यासाठी नवी उमेद तर मिळतच आहे आणि सुदृढ समाज घडवण्यासाठीही त्यांचे मोठे योगदान मिळत असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत.
अंबादास मंडलिक हे या सहा अंध – अपंगांना एका चारचाकी गाडीत घेवून अनेक ठिकाणी सामाजिक – धार्मिक कार्यक्रमात घेवून जावून त्यांच्या कलेतून त्यांची उपजिविका साधण्याचे काम करत आहेत. या अंध काही कलाकारांना शासनाचे दोन हजार रुपये मदत मिळत आहे तर वाद्यसाठी कुठलीही मदत त्यांना मिळालेली नाही दिवसभरात दिड – दोन हजार रुपयांची मदत समाजातून मिळते माञ वाहन खर्च जेवन व्यवस्था आणि आजारपणामुळे ही मदतही तुटपुंजी ठरत असल्याची माहिती यावेळी मंडलिक यांनी दिली.





