तळेगाव दाभाडे – जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. या पथकामध्ये पाच पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. चाकण विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे या एसआयटीच्या प्रमुख असणार आहे. तसेच तळेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील, पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल देवडे, पोलीस निरीक्षक रामचंद्र घाडगे आणि सहायक निरीक्षक संभाजी जाधव या पाच अधिकाऱ्यांचा एसआयटीमध्ये समावेश आहे. किशोर आवारे हत्या प्रकरणात मावळचे आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. आवारे यांच्यावर हल्ला करणाऱ्या चार मारेकऱ्यांची ओळख पटल्यावर पोलिसांनी शाम अरुण निगडकर (वय 46, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण उर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे (वय 32), आदेश विठ्ठल धोत्रे (वय 28, दोघे रा. नाणे, ता. मावळ), संदीप उर्फ नान्या विठ्ठल मोरे (रा. आकुर्डी), श्रीनिवास उर्फ सिनु व्यंकटस्वामी शिडगल (वय 41, रा. तळेगाव दाभाडे), गौरव चंद्रभान खळदे (वय 29, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांना अटक केली आहे. त्यांना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चार मारेकऱ्यांकडे केलेल्या चौकशीत जनसेवा विकास समितीचे माजी नगरसेवक चंद्रभान खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याचे नाव मुख्य सुत्रधार म्हणून पुढे आले आहे. वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी त्याने सुपारी देऊन किशोर आवारे यांची हत्या केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.