पुणे | किरकोळ वादातून बहिणीचा खून

पुणे , {प्रभात वृत्तसेवा} – मध्यरात्री भावाला झाेपेतून जागे केल्याने बहिणीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागातील वैदुवाडी परिसरात घडली. दरम्यान, खून केल्यानंतर बहिणीने आत्महत्या केल्याचा बनाव या नराधम भावाने रचला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात हा बनाव उघडकीस आला.
साफिया सुलेमान अन्सारी ( १६) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. तिचा भाऊ शारीख ( १८ रा. वैदूवाडी ) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पाेलीस निरीक्षक दीपक बर्गे यांनी हडपसर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अन्सारी कुटूंब वैदूवाडीतील रिद्धी -सिद्धी सोसायटीत राहायला आहेत. १७ जून रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास शारीख घरी आला. त्यावेळी साफिया झोपली होती.
शारीखला चादर पाहिजे होते. त्यामुळे त्याने दरवाजा वाजविला. त्यावर साफिया आणि शारीख यांच्यात वाद झाला. तिने रागाच्या भरात चाकूने शारीखवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली. त्यानंतर शारीखने तिचा गळा दाबून खून केला.
साफिया नेहमी आजारी असायची. आजारपणामुळे तिचा स्वभाव चिडचिडा झाला होता. किरकोळ वादातून ती आक्रमक व्हायची. १७ जून रोजी किरकोळ वादातून साफिया भाऊ शारीख याच्या अंगावर धावून गेली.
त्यावेळी त्यांच्यात झटापट झाली. रागाच्या भरात शारीखने तिचा गळा दाबला. तिचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर शारिख घाबरला. त्याने साफियाला गळफास दिला. तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.
या घटनेची माहिती मिळाल्यनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौकशी केली. घटनास्थळाची पाहणी केली. संशय बळावल्याने पोलिसांनी शारिखची चौकशी केली. तेव्हा हा प्रकार उघड झाला. पोलीस निरीक्षक मंगल मोढवे तपास करत आहेत.





