बहिणीची माया ! यकृत दान करत बहिणीने दिलं भावाला जीवदान

पुणे – भाऊ-बहिणीचं नात अत्यंत जिव्हाळ्याचं मानलं जातं. आई-वडिलांनंतर मुलीसाठी भाऊच आधार असतो. भाऊ देखील आपल्या बहिणीची संपूर्ण जबाबदारी पार पाडत असतो. मात्र बारामती येथील एका भावाला त्यांच्या बहिणीने यकृत दान देत जीवदान दिलं.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील भादे ग्रामपंचायतीच्या सदस्य असलेल्या बहिणीने बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील पोलीस असलेल्या भावाला स्वतःचे यकृत देत जीवदान दिले आहे.
नावडकर यांच्या कुटुंबातील मोठी मुलगी मालन बापूसाहेब चव्हाण यांनी आपला भाऊ रुपेश आप्पासाहेब नावडकर यांना यकृत दान करून त्यांचे प्राण वाचवले. रुपेश हे पोलीस कर्मचारी आहेत. त्यांचे यकृत खराब झाले होते. त्यांना तातडीने यकृताची गरज होती.
दरम्यान यकृतासाठी सगळीकडे शोधाशोध सुरू होती. पण यकृत मिळाणं कठीण झालं होतं. अशा परिस्थिती बहिण मालन आपल्या भावासाठी धावून आल्या. मालन यांनी धाडस दाखवत स्वतः चे यकृत देऊन भावाला पुनर्जन्म दिला.





