बहीण ‘कुणबी’ तर भाऊ ‘मराठा’; नगरमध्ये एकाच घरात आढळले वेगवेगळे दाखले

अहमदनगर – गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या गंभीर प्रश्नाने चांगलाच जोर धरला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ओबीसीमधून सरकट आरक्षणाची मागणी केली जात आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. राज्यभरात मराठा समाजाकडून साखळी उपोषण, आमरण उपोषण, तर काही ठिकाणी उग्र स्वरूपात आंदोलन करण्यात आले. अखेर सरकारने नोंदी तपासून मराठा समाजातील काहींना कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही देखील सुरु केली आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात अनेक ठिकाणी एकाच घरात बहिण कुणबी तर भाऊ मराठा असा उल्लेख असलेले शाळेचे दाखले असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे मराठा म्हणजेच कुणबी हे अनेक ठिकाणच्या दाखल्यांमधून स्पष्ट होत आहे. त्यामुळे सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण द्यावे अशी मागणी आता जोर धरत आहे. जामखेड तालुक्यातील मोरे कुटुंबात बहीण कुणबी तर भाऊ मराठा अशी नोंद शाळेच्या दाखल्यावर आढळून आली आहे. चंद्रभागा भाऊ गोरे – हिंदू कुणबी आणि दिगंबर भाऊ मोरे – हिंदू मराठा, अशी शाळेच्या दाखल्यांवर नोंद आढळली आहे.
सख्खे भाऊ बहीण असूनही दाखल्यांवर वेगवेगळी नोंद आहे. अजूनही अनेक जणांची अशीच नोंद मिळत आहे. राज्यातही असाच पेच निर्माण झाला आहे. काहींच्या नोंदी कुणबी तर नंतर त्यातील काही नोंदी मराठा म्हणून लावल्या गेल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. दोन भावंडांची प्रमाणपत्रे व्हायरल झाली होती. त्यातही एकाचे कुणबी तर दुसऱ्याचे मराठा उल्लेख होता. त्यामुळे प्रशासकीय कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. दरम्यान, जामखेड तालुक्यातील साकत गावात 1920 पर्यंत अनेक दाखल्यांवर कुणबी नोंद आहेत. 1920 नंतर मात्र मराठा नोंद लागल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
मराठा आरक्षणासाठी सरकारला आणखी दोन महिन्यांचा वेळ –
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्या वाद झाल्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यासह देशभरता पोहोचला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर 17 व्या दिवशी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले. यावेळी त्यांनी सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 40 दिवसांची मुदत दिली. या दरम्यान त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी दौरा करून भव्य सभा घेतल्या. मात्र सरकारने40 दिवसात आरक्षणाबाबत कोणताही ठोस तोडगा न काढल्याने जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले होते मात्र काल गुरुवारी त्यांनी सरकारला आणखी 2 महिन्यांचा वेळ दिला असून त्यानंतरही तोडगा न निघाल्यास मुंबईत लाखोंच्या संख्येने जाऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.





