Pimpri : साहेब, चॉकलेट देऊ नका, काम करा : आमदारांच्या पीएचा सहआयुक्तांना धमकीवजा इशारा

पिंपरी : ‘साहेब, चॉकलेट देऊ नका, मला शुगर आहे. त्यापेक्षा आमची कामे करा….’ असा इशारा चिंचवड विधानसभेच्या आमदारांच्या स्वीह सहायकाने सहआयुक्तांच्या त्यांच्याच दालनात दिला. यामुळे महापालिकेमध्ये अधिकार्यांवर राजकीय दबाव किती वाढला आहे हे समोर आले. गुरूवारी (दि. २४) महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरील सह आयुक्तांच्या दालनामध्ये घडलेल्या या प्रकाराने सगळेच अवाक झाले.
आमदार शंकर जगताप यांचे स्वीय सहायक (पीए) बाला शुक्ला हे गुरुवारी (दि.२४) महापालिका भवनात आले होते. त्यांनी सहआयुक्त मनोज लोणकर यांची त्यांच्या दालनामध्ये भेट घेतली. यावेळी शुक्ला यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि इतर काही प्रशासकीय कामांची यादी लोणकर यांच्यासमोर ठेवली. या सर्व कामांवर सहआयुक्त लोणकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, ती मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. कर संकलन मधील कर्मचार्याची बदली करू नका.
अभियंत्याला पदाचा कार्यभार द्या अशा अनेक सूचनांचा त्यांची भडीमार केला. त्यानंतर त्यांनी जाता-जाता सहआयुक्तांना उद्देशून एक सूचक विधान केले. साहेब, तुम्ही सगळ्याच कामांना हो म्हणत आहात, हे चांगलं आहे. पण नुसते चॉकलेट नका देऊ, मला शुगर आहे, असे ते म्हणाले. यातून साहेब आमचे काम करा, फक्त आश्वासने देऊ नका नाहीतर परिणाम वाईट होतील, असा गर्भित इशारा शुक्ला यांनी दिला.
आमदार कारवाई करणार का?
या घटनेमुळे महापालिका प्रशासनावर राजकीय व्यक्तींचा दबाव किती वाढला आहे, हे स्पष्ट झाले आहे. बदल्या, ठेके आणि अन्य आर्थिक हितसंबंधांच्या कामांसाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कशाप्रकारे दबाव टाकला जातो, हे या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. ही घटना महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनली असून, अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यावरून आमदार त्यांच्या स्वीह सहायकांवर कारवाई करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मी बाहेरगावी आहे, शहरामध्ये नाही. त्यामुळे नेमका काय प्रकार घडला आहे, याबाबत माहिती नाही. या प्रकरणाची मी सविस्तर माहिती घेतो.
– शंकर जगताप, आमदार.





