Sinhgad Technical Education Society: सिंहगडची २३० कोटींची थकबाकी वसूल करा
Sinhgad Technical Education Society:

आठ दिवसांत अहवाल सादर करण्याचे स्थायी समितीचे प्रशासनाला आदेश
Sinhgad Technical Education Society: सिंहगड शिक्षण संस्थेकडे असलेल्या २३० कोटी रुपयांच्या थकीत मिळकतकराच्या वसुलीसाठी महापालिका आता ठोस कारवाई करावी. येत्या आठ दिवसांत कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा, असे स्पष्ट आदेश महसूल समितीच्या बैठकीत प्रशासनाला दिल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
सिंहगड शिक्षण संस्थेकडे मिळकतकराची २३० कोटींची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी पालिकेच्या कर संकलन विभागाने यापूर्वीच संस्थेच्या २८ मिळकतींना नोटिसा बजावल्या आहेत.
मात्र, वसुली करण्यासाठी पुढील कारवाईची गरज असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे केवळ नोटिसा बजावून न थांबता प्रत्यक्ष कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
आठ दिवसांत संबंधित मिळकतींवर कारवाई करावी. आवश्यकतेनुसार मिळकती सील कराव्यात किंवा त्यांचा ताबा घेण्याची प्रक्रिया राबवावी. त्यानंतर थकबाकी वसुलीसाठी मिळकतींचा लिलाव करण्याची पावले उचलण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी वर्गखोल्या वगळून संस्थेच्या अन्य मिळकती सील करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
मोठ्या प्रमाणात थकबाकी असलेल्या मिळकतधारकांकडून वसुलीसाठी प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित होतो. सिंहगड संस्थेच्या थकबाकीप्रकरणी आठ दिवसांची मुदत देण्यात आल्याने आता कर संकलन विभाग कोणती कारवाई करतो, तसेच किती थकबाकी वसूल होते, याकडे लक्ष लागले आहे.





