पुणे:1 लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी सिंहगड ठाण्यातील पोलीस निलंबित

पुणे –फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये लाच स्वीकारणाऱ्या सिंहगड रोड ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. हवालदार ज्ञानेश्वर दिनकर माडिवाले असे निलंबित पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याने झीरो पोलीस मिलिंद चौरे याच्यामार्फत 13 डिसेंबर 2021 रोजी लाच स्वीकारल्याचे सिद्ध झाले आहे.
दरम्यान, फिर्यादी यांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तांकडे अर्ज केला होता. सिंहगड रोड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तांमार्फत अर्जाची चौकशी झाली. यानंतर त्यांनी अहवाल दिल्यानंतरही माडिवाले याने उशिरा गुन्हा दाखल केला. 20 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या अर्जाचा माडिवाले याने जाणीवपूर्वक 24 जानेवारी 2022 रोजी गुन्हा दाखल करून घेतला. त्यासाठी फिर्यादीकडून एक लाख रुपये लाच घेतली. तसेच, आरोपींना अटक करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादींनी पैसे न दिल्याने आरोपींना जामीन घेण्याचा सल्लाही माडिवाले याने दिला. आरोपींना गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचे निलंबन आदेशात म्हटले आहे.





