Pune | सिंहगड इन्स्टिट्यूटला महापालिकेचा धक्का

पुणे : महापालिकेकडून मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी मिळकती सील करणे आणि जप्त करण्याची कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आली आहे. या मोहीमेअंतर्गत महापालिकेकडून सिंहगड इन्स्टिट्यूटवर या वर्षातील सर्वांत मोठी कारवाई करण्यात आली असून, ४७ कोटी ४३ लाख रुपयांच्या थकबाकीप्रकरणी एरंडवणे भागातील संस्थेच्या मुख्य कार्यालयासह २६ इमारती जप्त करण्यात आल्या आहेत.
एका महिन्याच्या आत ही पूर्ण रक्कम न भरल्यास या इमारतींचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येणार असल्याची माहिती मिळकतकर विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून थकबाकी वसुलीसाठी मोहीम सुरू केल्यानंतर १६५ मिळकतींसमोर बँड वाजवून १४ कोटी १४ लाख २६ हजार २१२ रुपये इतकी थकबाकी वसूल केली आहे. जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात अनेक भागत सिंहगड इन्स्टिट्यूटच्या मिळकती आहेत. त्यातील अनेक इमारतींचा मिळकतकर गेल्या पाच वर्षांपासून भरण्यात आलेला नाही.
पुणे महापालिकेने ही थकबाकीची रक्कम भरावी यासाठी नोटीस बजावली होती; पण त्यास नकार देत संस्थेने महापालिकेच्या विरोधात याचिका दाखल केली होती. न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये महापालिकेने केलेली कारवाई योग्य आहे, संस्थेने त्यांची थकबाकी भरावी, असे आदेश दिले होते. त्यानंतरही ही थकबाकी न भरल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचेही जगताप यांनी स्पष्ट केले, तर संस्थेच्या मुख्य इमारतीसमोर बँड वाजवून एरंडवणा येथील मुख्यालयासह २६ इमारतींची जप्त करण्याची नोटीस बजावली आहे.
सध्या केवळ इमारती जप्त केल्या आहेत, त्यांना टाळे लावलेले नाही. त्यामुळे तेथील कार्यालय व शैक्षणिक कामकाज सुरू राहील; पण एका महिन्यात संस्थेने पैसे भरले नाहीत, तर इमारतींबाबत पुढील कारवाई करावी लागेल.
– माधव जगताप, उपायुक्त, कर संकलन विभाग





