पुणे | सिंहगड घाट रस्ता नियंत्रण वनविभागाच्या हाती

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पावसाळा सुरू झाल्यापासून सिंहगड किल्ल्यावर प्रचंड गर्दी झाल्यामुळे वन अधिकाऱ्यांना घाट भागातील वाहनांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे तरी किमान येथे गर्दीच्यावेळी वाहतूक कोंडी होणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून सिंहगड किल्ल्यावर पुणेकर, विद्यार्थी आणि पर्यटकांची सर्वत्र गर्दी असते आणि बहुतेक जण वीकेंडला गडाला भेट देतात, त्यामुळे ही विशेष गर्दी होते. हा प्रकार दरवर्षीच अनुभवायला येत असून, ही वाहतूक कोंडी कमी करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून होतात, परंतु पर्यटकांची संख्या मोठी असल्याने ती नियंत्रणात येत नाही.
पावसाळा सुरू झाल्यापासून सिंहगड किल्ल्यावर प्रचंड गर्दी झाल्याने वन अधिकाऱ्यांना गेल्या रविवारी दिवसभरात तब्बल पाच वेळा घाट सेक्शन रोडवरून वाहने थांबवावी लागली. पुनरावृत्तीची परिस्थिती टाळण्यासाठी, सिंहगड किल्ला वन अधिकारी आता येत्या वीकेंडपासून नवीन नियोजन करत आहेत.
आम्ही आता दोन्ही बाजूंनी वेळेनुसार वाहने सोडण्याचे नियोजन करत आहोत. आमच्या योजनेनुसार गडाच्या पायथ्यापासून येणारी वाहने एका तासासाठी चेक पोस्टवर गडाच्या माथ्यावर सोडली जातील.
त्या एक तासात गडमाथ्यावरील पार्किंगमधून गडाच्या पायथ्यापर्यंत एकही वाहन सोडले जाणार नाही. पुढील एक तासात गडाच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत वाहने सोडली जातील, तर गडाच्या पायथ्यापासून एकही वाहन सोडले जाणार नाही, असे, वनविभागाचे अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी सांगितले.
फिरायला जागा नाही, अपघाताचा धोका
सिंहगडावर नेहमी ट्रेकिंगला जाणाऱ्या नागरिक मात्र वीकएण्डला तेथे जाणे टाळत आहेत. तेथे होणारी प्रचंड गर्दी आणि तासनतास वाहतूक कोंडीमध्ये अडकणे असे प्रकार होतात. किमान दोन-तीन तास या वाहतूक कोंडीत अडकावे लागते. घाट भागात फिरायला जागा नाही आणि त्यामुळे अपघाताचा धोका आहे, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली आहे.




