Sindkhed Raja: प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी या मतदारसंघातून काढता पाय का घेतला? याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सिंदखेड राजा मतदारसंघात मनोज कायंदे यांना उमेदवारी दिली होती. तर या ठिकाणी शिवसेनेने शशिकांत खेडेकर यांना संधी दिली होती. एकाच मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार दिल्यामुळे येथे मोठा पेच निर्माण झाला होता. पण प्रचाराच्या अखेरच्या दिवशी अजित पवार यांनी मोठे मन करत याठिकाणी शशिकांत खेडेकर या शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. आता या मतदारसंघात खेडेकर यांचा सामना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्याशी होईल.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आज एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. या पत्रकामध्ये असे म्हटले आहे की, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, भाजपा, शिवसेना, रिपाई (आ) व अन्य घटक पक्ष मिळून महायुती म्हणून, सर्व पक्ष एकत्रित, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निवडणुकीला सामोरे जात आहेत.





