Narhari Zirwal : अजितदादा गेल्यापासून घड्याळ थोडं मागे पुढे होतंय; नरहरी झिरवळांचं वक्तव्य, लाडकी बहिण योजनेवर थेट बोलले…
Narhari Zirwal : अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या घड्याळाची वेळ थोडी मागे-पुढे होत असल्याचे विधान त्यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यातील एका गावात माध्यमांशी संवाद साधताना नरहरी झिरवळ यांनी हे वक्तव्य केले.

Narhari Zirwal : राज्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चेने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून वेगवेगळे दावे आणि प्रतिदावे केले जात असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवळ यांच्या एका वक्तव्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाच्या घड्याळाची वेळ थोडी मागे-पुढे होत असल्याचे विधान त्यांनी केले आहे. नांदेड जिल्ह्यातील एका गावात माध्यमांशी संवाद साधताना नरहरी झिरवळ यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय म्हणाले नरहरी झिरवळ?
अजित पवार यांच्या कार्यकाळाची आठवण सांगताना झिरवळ म्हणाले, “अजितदादा गेल्यापासून घड्याळ थोडं मागे-पुढे होतं आहे. अजितदादा पवार असताना घड्याळ एक मिनिटही मागे-पुढे होत नव्हते. आता घड्याळ थोडं मागे-पुढे होत असले तरी घड्याळ व्यवस्थित आहे.”
लाडकी बहीण योजनेवरही झिरवळांचे मोठं विधान
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरूनही नरहरी झिरवळ यांनी मोठं वक्तव्य केले आहे. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडत असल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. योजनेसाठी विविध विभागांचा निधी वळवला जात असल्याचा आरोपही विरोधकांकडून केले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर बोलताना झिरवळ यांनी सरकारची सध्याची परिस्थिती ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी झाल्याचे म्हटले. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला आर्थिक नियोजन करताना कसरत करावी लागत असल्याचेही त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काढला जात आहे.
एकीकडे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा, तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा आर्थिक भार अशा दोन्ही मुद्द्यांवर नरहरी झिरवळ यांनी केलेल्या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.





